मंत्र्यांपैकी जेटलींकडे सर्वाधिक कॅश

पाचशे आणि एक हजार रुपयांच्या जुन्या नोटा रद्द करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला.

Updated: Dec 2, 2016, 02:58 PM IST
मंत्र्यांपैकी जेटलींकडे सर्वाधिक कॅश  title=

नवी दिल्ली : पाचशे आणि एक हजार रुपयांच्या जुन्या नोटा रद्द करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला. या निर्णयानंतर नागरिकांनी बँकांबाहेर मोठ्या प्रमाणावर रांगा लावल्या. जुन्या नोटा परत करण्याच्या या रांगांमध्ये ना कोणी मंत्री होता ना कोणी खासदार. त्यामुळे त्यांच्याकडे जुन्या नोटा आहेत का नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

या सगळ्या पार्श्वभूमीवर मंत्र्यांकजे 31 मार्च 2016 साली असलेल्या कॅशबाबत माहिती समोर आली आहे. मोदींच्या मंत्रिमंडळातल्या अरुण जेटली यांच्याकडे सर्वाधिक 65 लाख रुपयांची कॅश आहे तर या यादीमध्ये श्रीपाद येसो नाईक दुसऱ्या आणि हंसराज अहिर तिसऱ्या क्रमांकावर आहेत. नाईक यांच्याकडे 22 लाख रुपये तर अहिर यांच्याकडे 10 लाख रुपये एवढी कॅश आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे 31 मार्च 2016ला 89,700 रुपये एवढी कॅश होती. मोदींच्या मंत्रिमंडळातल्या 23 मंत्र्यांकडे दोन लाख रुपयांपेक्षा कमी तर 15 मंत्र्यांकडे अडीच लाखांपेक्षा जास्त कॅश आहे.

मंत्र्यांच्या आचारसंहितेनुसार प्रत्येक मंत्र्यांला पंतप्रधान कार्यालयात संपत्ती जाहीर करावी लागते. पंतप्रधान कार्यालयानं त्यांच्या वेबसाईटवर 31 मार्च 2016 पर्यंतची आकडेवारी दिली आहे. नितीन गडकरी, मनोहर पर्रिकर आणि उमा भारती यांनी ही माहिती दिलेली नाही.

31 मार्च 2016 म्हणजेच नोटबंदी निर्णयाच्या खूप आधी या मंत्र्यांनी त्यांच्याकडे असलेली कॅश घोषित केली आहे. पण मधल्या काळामध्ये आणि नोटबंदीबाबतचा तपशील अजूनही मिळू शकलेला नाही.