नरेंद्र मोदींची नवी टीम, आडवाणी, गडकरींना स्थान

भाजपच्या २०१४च्या निवडणूक समितीची घोषणा काल करण्यात आली. त्यासाठी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली एक केंद्रीय समिती तसंच २० विविध समित्या स्थापन करण्यात आल्यात.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jul 20, 2013, 08:15 AM IST

www.24taas.com, झी मीडिया,नवी दिल्ली
भाजपच्या २०१४च्या निवडणूक समितीची घोषणा काल करण्यात आली. त्यासाठी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली एक केंद्रीय समिती तसंच २० विविध समित्या स्थापन करण्यात आल्यात.
मोदींच्या बारा जणांच्या प्रचार समितीमध्ये डॉ. मुरली मनोहर जोशी, सुषमा स्वराज, अरुण जेटली यांचाही समावेश करण्यात आलाय. तर वीस उपसमित्यांत पक्षातील जुन्याच नेत्यांना स्थान देण्यात आले आहे. या बहुचर्चित समितीत नवीन चेहऱ्यांचा अभाव असून, गेल्या दोन निवडणुकांत व्यासपीठावरच असलेल्या अनेक चेहऱ्यांना पुन्हा प्रभावी जबाबदाऱ्या मिळाल्याचे दिसत आहे. या सर्व समित्या आपल्या कामकाजाचे रिपोर्टिंग मोदींनाच करतील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
केंद्रीय समितीमध्ये मुरली मनोहर जोशी, व्यंकय्या नायडू, नितीन गडकरी, सुषमा स्वराज, अरूण जेटली, अनंत कुमार, थावरचंद गेहलोत, रामलालजी, आणि तीन मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान, रमणसिंग आणि मनोहर पर्रीकर यांचा समावेश आहे. तर राजनाथ सिंह आणि नितीन गडकरी यांच्यावर दिल्ली विधानसभेची जबाबदारी देण्यात आलीय.

वीस समित्यांमध्ये मोदींचे नेतृत्व लालकृष्ण आडवाणी, अजबिहारी वाजपेयी आणि राजनाथसिंह यांचे मार्गदर्शन आणि आणखी अकरा जणांची समिती प्रमुखस्थानी राहणार आहे. यात डॉ. जोशी, श्रीमती स्वराज व रामलाल यांच्यासह मनोहर पर्रीकर, शिवराजसिंह चौहान व रमणसिंह हे तीन मुख्यमंत्री यात आहेत. या वीस समित्यांचे दोन भाग करून त्यांचे नेतृत्व वेंकय्या नायडू आणि नितीन गडकरी यांच्याकडे देण्यात आले आहे.
नितीन गडकरी यांच्यावर दिल्ली विधानसभेची विशेष जबाबदारी देण्यात आली आहे. आरोपपत्राच्या अभिनव कल्पनेची जबाबदारी गोपीनाथ मुंडे तसेच रविशंकर प्रसाद यांच्यावर असेल. तर विनय सहस्रबुद्धे, श्‍याम जाजू, किरीट सोमय्या, पूनम महाजन, स्मृती इराणी, व्ही. सतीश ऊर्फ सतीश वेलणकर तर पीयूष गोयल आणि वाणी त्रिपाठी यांचीही वेगवेगळ्या समित्यांमध्ये वर्णी लावण्यात आलेय.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.