‘आसाराम बापूंची पुस्तकं जाळून टाकणार’

By Shubhangi Palve | Last Updated: Wednesday, January 9, 2013 - 09:57

www.24taas.com, बलिया, उत्तरप्रदेश
मानवतेलाही काळीमा फासणाऱ्या दिल्लीच्या सामूहिक बलात्काराच्या घटनेत मुलीलाच दोषी ठरवणाऱ्या आसाराम बापूंची समाजातील सर्वच स्तरांतून निंदा होतेय. खुद्द पीडित मुलीच्या कुटुंबीयांनीही स्वत:ला अध्यात्मिक गुरू म्हणवणाऱ्या आसाराम बापूंवर करडी प्रतिक्रिया दिलीय.
‘आसाराम बापूंकडून अशी प्रतिक्रिया अपेक्षित नव्हती. असं विधान करून बापूंनी आपल्या अध्यात्माचं दर्शन घडवल्याचं’ या पीडित तरुणीच्या कुटुंबीयांनी म्हटलंय. ‘टाळी एका हाताना वाजत नाही... बलात्कार होत असताना तिनं हल्लेखोरांच्या पाया पडायला हवं होतं, त्यांना ‘भाऊ’म्हणायला हवं होतं मग आरोपींनी तिला सोडून दिलं असतं’ असं बेजबाबदार विधान आसाराम बापूंनी दोन दिवसांपूर्वी केलं होतं.

यावर मुलीचे वडील म्हणतात, ‘अशा तर्कशून्य विधानाची अपेक्षा आसाराम बापूंकडून आम्ही कधीच केली नव्हती. त्यांचं हे विधान खूपच खालच्या दर्जाचं आहे. यामुळे आसाराम बापूंची खरी मानसिकता आणि विचारसरणीच लोकांच्या समोर आलीय. संत अशा पद्धतीनं बरळणं शक्य नाही. त्याच जागी आसाराम बापूंची स्वत:ची मुलगी किंवा नात असती तर त्यांनी खरंच अशी प्रतिक्रिया दिली असती का?’.
पीडित मुलीचे कुटुंबीय आत्तापर्यंत आसाराम बापूंचे भक्त होते. त्यांच्या घरात याच अध्यात्मिक गुरुच्या प्रवचनांची अनेक पुस्तकंही आहेत. पण, आता मात्र त्यांना ही सर्व पुस्तकं जाळून टाकावीशी वाटत आहेत.First Published: Wednesday, January 9, 2013 - 09:57


comments powered by Disqus