गोव्यात ख्रिसमसची धूम

By Jaywant Patil | Last Updated: Tuesday, December 25, 2012 - 08:19

www.24tas.com, पणजी
प्रेम, शांती आणि आनंद यांचा संदेश जगाला देणा-या येशू खिस्ताचा जन्मदिवस म्हणजे ख्रिसमस...गोव्यात ख्रिसमसची धूम आहे. विद्युत रोषणाईचा झगमगाट, कॅरलचे सूर, बायबलचं वाचन आण मिडनाईट मास अशा विविध रंगात गोव्यात ख्रिसमस साजरा करण्यात येतोय.
राजधानी पणजीतल्या डॉन बॉस्को क्रिडांगणावरच्या भव्य मिडनाईट मासला हजारो ख्रिस्ती बांधवांनी उपस्थिती लावली. त्याचबरोबर बिशप पॅलेसमध्ये मुख्य आर्च बिशप यांनी संदेश वाचन केलं. याशिवाय ओल्ड गोवा येथील बेसेलिका ऑफ बाम जिझस, सी कॅथेड्रील, सेंट मेरी इम्यॅक्युलेट सारख्या चर्चमध्येही विशेष प्रार्थना सभांनी ख्रिसमसचं स्वागत करण्यात आलं. यावेळी सुरक्षेच्या दृष्टीनं कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मध्यरात्रीच्या विशेष प्रार्थनेनंतर केकचं वाटप करत हॅपी ख्रिसमस, मेरी ख्रिसमसच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
ख्रिसमस म्हणजे लज्जतदार केकची अपूर्व मेजवानी... त्यामुळे गोव्यात ख्रिसमससाठी केकच्या नानाविध प्रकारांनी केक शॉप्स सजले आहेत. साध्या केकसोबत खास व्हेजेटेरियन केकही बाजारात दिसू लागलेत. त्याचबरोबर ख्रिसमस पुडींग, कुकीज, बिबिनका, दोदोल यासारखे शेकडो पेस्ट्रीज खरेदीसाठी ग्राहकांनी केक शॉपमध्ये गर्दी केली आहे. तर ख्रिसमसच्या गिफ्ट खरेदीसाठीही एकच झुंबड उडाली आहे. ५०० रुपयांपासून ५ हजार रुपयांपर्यंतच्या आकर्षक गिफ्ट्सनी बाजार फुललाय.
पणजीतील प्रसिद्ध सेंट मेरी इमुक्युलेट, बिशप पॅलेस, डॉन बॉस्को चर्च बरोबरच ओल्ड गोवा, मडगाव, वास्कोमधील असंख्य चर्चमध्ये ख्रिसमसच्या स्वागताची जंगी तयारी करण्यात आली आहे. सर्वच चर्चमध्ये करण्यात आलेली विद्युत रोषणाई विशेष लक्षवेधी आहे.

First Published: Monday, December 24, 2012 - 21:51
comments powered by Disqus