कर्नाटकचा काँग्रेसला कौल

कर्नाटकच्या जनतेनं काँग्रेसला कौल दिलाय. मात्र याचवेळी भाजपला अनपेक्षित अशा धक्कादायक पराभवाला सामोरं जावं लागलंय.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: May 8, 2013, 11:59 PM IST

www.24taas.com, झी मीडीया, बंगळुरू
कर्नाटकच्या जनतेनं काँग्रेसला कौल दिलाय. मात्र याचवेळी भाजपला अनपेक्षित अशा धक्कादायक पराभवाला सामोरं जावं लागलंय. येडियुरप्पांच्या केजीपीला अपेक्षित यश मिळालं नसलं तरी भाजपला चारही मुंड्या चित करण्यात मोठी भूमिका बजावलीय. गेल्या निवडणुकीत भाजपला मिळालेल्या सहानुभूतीचा फटका बसलेल्या जेडीएसनंही भाजपएवढ्याच जागा काबिज केल्या आहेत.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा अपेक्षेप्रमाणे विजय झालाय. मात्र सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे सत्ताधारी भाजपला पन्नासचा आकडा देखील गाठता आलेला नाही. भाजपला साधं विरोधी पक्षनेतेपदही राखता आलेलं नाही. त्यामुळं भाजपचा चारमुंड्या चित असाच पराभव झालाय. तर जेडीएसनं गेल्या निवडणुकीच्या तुलनेत चांगली कामगिरी नोंदवलीय. मात्र ज्या येडियुरप्पा फॅक्टरमुळं भाजप धुळीला मिळाली त्या केजीपीलाही अपेक्षेप्रमाणे यश मिळालेलं नाही. मात्र येडियुरप्पांच्या केजीपीनं भाजपचं अतोनात नुकसान केलंय. गेल्या दोन निवडणुकांपासून त्रिशंकू अवस्थेत असलेल्या कर्नाटक विधानसभेत यावेळी 120 जागांसह काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालेले आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत काँग्रेसला तब्बल 39 जागांचा फायदा झालाय. जेडीएसला 40 जागांवर विजय मिळाला असून गेल्या वेळच्या तुलनेत 12 जागा जास्त मिळवण्यात जेडीएसला यश आलंय़. भाजपचा मात्र कर्नाटकच्या जनतेनं साफ नाकारलंय. केवळ 40 जागांवर समाधान मानावं लागलं असून तब्बल 70 जागा भाजपला गमवाव्या लागल्या आहेत. केजीपीच्या पदरातही केवळ सात जागा पडल्या असून 16 जागांवर अपक्षांनी बाजी मारलीय. या विजयामुळं केंद्रात घोटाळ्यांनी घेरलेल्य़ा काँग्रेसचा आत्मविश्वास दुणावलाय.

तर दुसरीकडे विरोधी पक्षनेतेपदासाठी झगडण्याची नामुष्की भाजपवर ओढवली आहे. पक्षाची कामगिरी धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया भाजपनं दिलीय. भाजपसह दुस-या क्रमांकावर असलेल्या जेडीएसनं विरोधी बाकांवर बसण्याची तयारी दर्शवली असली तरी हा काँग्रेसचा विजय नसून मीडियाचा विजय असल्याची अजब प्रतिक्रिया दिलीय. येडियुरप्पांच्या बाहेर पडण्याने भाजपचे नुकसान होणार हे स्पष्ट होते. मात्र एवढा दारूण पराभव भाजपला नक्कीच अनपेक्षित आणि विचार करायला लावणारा आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.