काँग्रेस परिवर्तन यात्रेचा मार्ग ऐनवेळी बदलला

नक्षल हल्ल्याबाबत नवी माहिती समोर आलीये. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेचा मार्ग एका स्थानिक नेत्याच्या सांगण्यावरून ऐनवेळी बदलण्यात आल्याची माहिती यंत्रणांच्या हाती लागलीये.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: May 27, 2013, 03:10 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, रायपूर
नक्षल हल्ल्याबाबत नवी माहिती समोर आलीये. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेचा मार्ग एका स्थानिक नेत्याच्या सांगण्यावरून ऐनवेळी बदलण्यात आल्याची माहिती यंत्रणांच्या हाती लागलीये.
सुकमा इथं दबा धरून बसलेल्या नक्षल्यांना यामुळेच हा भयानक हल्ला करणं शक्य झालं. हा मार्ग बदलण्यास सांगणारा नेता कोण, हा निर्णय कशासाठी घेतला गेला अशा प्रश्नांची उत्तरं आता तपासयंत्रणा शोधत आहेत. दुसरीकडे या प्रकरणाचा तपास NIA कडे देण्यात आलाय. या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या काँग्रेस नेत्यांवर आज अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
नक्षलवाद्यांनी काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेवर केलेल्या हल्ल्यात माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे नेते विद्याचरण शुक्ल गंभीर जखमी झालेत.. त्यांना पाठीत 3 गोळ्या लागल्या आहेत. त्यांची प्रकृती गंभीर असून त्यांना उपचारासाठी दिल्लीमध्ये हलवण्यात आलंय. दिल्लीतल्या रुग्णालयात त्यांच्यावर एक तातडीनं शस्त्रक्रीया करण्यात आली. त्यांची प्रकृती स्थिर असली तरी अद्याप धोका टळला नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांनी त्यांची रुग्णलयात भेट घेतली.
छत्तीसगडमधल्या नक्षलवाजद्यांच्या हल्ल्यावरून राजकारण तापलंय. काँग्रेसच्या परिवर्तन रॅलीला पुरेशी सरक्षा व्यवस्था नव्हती असा आरोप काँग्रेसनं केलाय. तसंच या हल्ल्याची जबाबदारी छत्तीगड सरकारनं घ्यावी अशी मागणीही कायदामंत्री कपिल सिब्बल यांनी केलीय. तर भाजपनं काँग्रेसचे आरोप फेटाळून लावले आहेत.

काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी या प्रकरणात भाजपा सरकारला लक्ष्य केलंय. या हल्ल्यात जखमी झालेले सर्व जण लवकरात लवकर बरे व्हावी अशी मी प्रार्थना करतो. छत्तीसगड सरकारनं या हल्ल्याची जबाबदारी घ्यायला हवी. काँग्रेस नेत्यांना सुरक्षा पुरवण्यात सरकार अपयशी ठरलंय. अशी टीका दिग्विजय सिंह यांनी केलीय. तर हा हल्ला ही अतिशय धक्कादायक आणि दुर्दैवी घटना आहे. या प्रकरणाचे कोणीही राजकारण करु नये असं आवाहन विरोधी पक्ष नेत्या सुषमा स्वराज यांनी केलंय.
काल रात्री नक्षलवाद्यांनी काँग्रेसच्या परिवर्तन रॅलीवर केलेल्या हल्ल्याचे तीव्र पडसाद छत्तीसगडमध्ये उमटले आहेत. काँग्रेसनं छत्तीसगड बंदची हाक दिली आहे. त्यामुळं राज्यातले अनेक व्यवहार आज ठप्प आहेत. रायपूरमध्येही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रेलरोको केलाय.
छत्तीसगडमधल्या नक्षलवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मनमोहन सिंग आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी सुकमाला भेट दिली. या हल्ल्यात जखमी झालेल्यांची भेट घेऊन पंतप्रधानांनी त्यांची विचारपूस केली. जखमींवर उपचार करणं हे प्राध्यानं असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. नक्षलवाद्यांशी लढण्यासाठी कठोर पाऊलं उचलण्याची गरज असून अशा संवेदनशील मुद्यावर सर्वांनी एकत्रित येण्याची आवश्यकताही पंतप्रधानांनी व्यक्त केली.
या हल्ल्यातलं काँग्रेस कार्यकर्त्यांचं बलिदान व्यर्थ जाणार नसल्याचंही सिंग यांनी नमूद केलं. नक्षलवाद्यांच्या हल्ल्यातील मृतांची संख्या २९वर गेलीय. तर ४० पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. काँग्रेसचे छत्तीसगड प्रदेशाध्यक्ष नंदकुमार पटेल आणि त्यांचा मुलगा दिनेश पटेल यांची नक्षलवाद्यांनी हत्या केलीय. करण्यात आलीय. या दोघांचे काल संध्याकाळी अपहरण करण्यात आले होते. या दोघांचाही मृतदेह सापडला असून त्यांच्या हत्येनं नक्षलवाद्यांचा काळा चेहरा पुन्हा एकदा समोर आलाय.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.