आंध्र प्रदेशला चक्रीवादळ, मुसळधार पावसाचा तडाखा

आंध्र प्रदेशला पुन्हा एकदा चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे. हेलेन या चक्रीवादळाने जोरदार तडाखा दिला आहे. फायलिन वादळानंतर हेलेनने तडाखा दिला आहे. या वादळबरोबरच मुसळधार पाऊस कोसळत आहे. याचा जनजीवनावर परिणाम झाला आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Nov 22, 2013, 04:34 PM IST

www.24taas.com, वृत्तसंस्था, हैदराबाद
आंध्र प्रदेशला पुन्हा एकदा चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे. हेलेन या चक्रीवादळाने जोरदार तडाखा दिला आहे. फायलिन वादळानंतर हेलेनने तडाखा दिला आहे. या वादळबरोबरच मुसळधार पाऊस कोसळत आहे. याचा जनजीवनावर परिणाम झाला आहे.
हेलेन चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या मच्छिलीपट्टण किनाऱ्याजवळ शुक्रवारी दुपारी धडकले. या वादळाबरोबरच मुसळधार पाऊस कोसळत आहे. वादळाचा जोर कायम असून वारे ताशी १०० ते ११० किलोमीटर वेगाने वाहत आहेत. या वादळाने अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले आहेत. वीज आणि दूरध्वनी टॉवरही कोसळल्याने या भागातील वीज आणि दळणवळण यंत्रणा कोलमडली आहे. तर समुद्र खवळलेला आहे.
चक्रीवादळाचा तडाखा नारळ, केळी आणि भात पिकाला बसला. नैसर्गिक आपत्तीने येथील शेतकरी हवालदील झाले आहेत. वादळाचा जोर कायम असल्याने किनारपट्टी भागातील जिल्ह्यांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. कृष्णा, गुंटूर, पूर्व गोदावरी, पश्चिम गोदावरी, प्रकाशम आणि विशाखापट्टणम् या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळण्याचा इशारा हवामान विभागने दिला आहे. तसेच आंध्र प्रदेशसह रायलसीमा आणि तेलंगण येथेही येत्या ४८ तासात मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
वादळाच्या पार्श्वभूमीवर किनारपट्टी भागातील सर्व शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. तर आपत्ती विभागाने नैसर्गिक घडामोडींवर लक्ष ठेवले आहे. राज्य आपत्ती प्रतिसाद पथके तैनात ठेवण्यात आली आहेत. पाचही जिल्ह्यांत जीवनावश्यीक वस्तूंबरोबरच आवश्यक औषधांचा साठाही उपलब्ध करून ठेवण्यात आला आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.