पाच वर्षांच्या चिमुरडीला ४० तास कोंडून बलात्कार

दिल्लीमध्ये आणखी एक बलात्काराची घटना समोर आलीय. गांधीनगर परिसरात अवघ्या पाच वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिचा निर्घृण खून झाल्याची घटना घडलीय.

www.24taas.com, दिल्ली
दिल्लीमध्ये आणखी एक बलात्काराची घटना समोर आलीय. गांधीनगर परिसरात अवघ्या पाच वर्षांच्या मुलीवर पाशवी बलात्कार केल्याची घटना घडलीय.
संबंधित पाच वर्षांच्या चिमुरडीला तब्बल ४० तास एका खोलीत कोंडून ठेवण्यात आलं होतं. तिथून सुटका केल्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिच्या शरिरामध्ये तीन मेणबत्या आणि काचेचे तुकडे आढळले आहेत. त्यावरून आरोपी किती विकृत असावा, याची कल्पना येऊ शकेल. पूर्व दिल्लीच्या गांधीनगर भागात ही घटना घडलीय. शेजारीच भाड्यानं राहणाऱ्या तरुणानं हे घृणास्पद कृत्य केल्याचा पोलिसांना संशय आहे. दोन दिवस सतत या मुलीवर अत्याचार करण्यात आले. त्यानंतर पकडल्या जाण्याच्या भीतीनं आरोपीनं मुलीला घटनास्थळीच सोडून पलायन केलं.

रविवारी संध्याकाळपासून गायब असलेल्या आपल्या चिमुरडीला शोधण्यासाठी तिच्या कुटुंबियांनी जंग जंग पछाडलं. अखेर ते राहत असलेल्या इमारतीच्या तळमजल्यावरच्या एका फ्लॅटमध्ये ही मुलगी अत्यवस्थ अवस्थेत सापडली. गंभीर अवस्थेत या चिमुरडीला हॉस्पीटलमध्ये हलवण्यात आलं तिची प्रकृती चिंताजनक असून ती मृत्यूशी झुंज देतेय.

दरम्यान, आरोपी फरार असताना त्याचा तपास करायचं सोडून पोलिसांनी प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप मुलीच्या वडिलांनी केलाय. आपल्याला तक्रार न करण्यासाठी दोन हजार रुपये देऊ केल्याचं तिच्या वडिलांचं म्हणणं आहे.