दिल्ली गँगरेप : बलात्काऱ्यांना फाशीच!

आज दिल्लीच्या साकेत कोर्टानं एक ऐतिहासिक निकाल दिलाय. दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणातील मुकेश (वय २६), विनय शर्मा (२०), पवन गुप्ता (१९) व अक्षय सिंह ठाकूर (२८) या चारही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Sep 13, 2013, 03:54 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
आज दिल्लीच्या साकेत कोर्टानं एक ऐतिहासिक निकाल दिलाय. दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणातील मुकेश (वय २६), विनय शर्मा (२०), पवन गुप्ता (१९) व अक्षय सिंह ठाकूर (२८) या चारही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आलीय.
न्यायाधीश योगेश खन्ना यांनी हा निर्णय सुनावल्यानंतर मुकेश, विनय, पवन यांच्या पायाखालची जमीनच हादरली. त्यांना त्याक्षणीच रडू कोसळलं आणि ते ओक्साबोक्शी रडू लागले. तर अक्षय सिंह या जागीच स्तब्ध झाला. त्याला काही प्रतिक्रियाच देता आली नाही. १६ डिसेंबर २०१३ रोजी चालत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित तरुणीला अखेर न्याय मिळालाय, अशीच प्रतिक्रिया संपूर्ण देशभर व्यक्त होतेय. दिल्ली गँगरेप प्रकरणानं देशभरात एकच खळबळ उडाली होती आणि सरकारनंही पुढाकार घेत कडक बलात्कारविरोधी कायदा आणला होता.
सामूहिक बलात्कार आणि हत्या या आरोपांशिवाय या चौघांना हत्येचा प्रयत्न, अनैसर्गिक शारीरिक संबंध, दरोडा, पुरावे नष्ट करणे, कट रचणे, अपहरण किंवा हत्येच्या उद्देशाने पळवून नेणे, या आरोपांखाली कोर्टानं दोषी ठरविलं होतं.
या प्रकरणातील एका आरोपीनं तुरुंगातच आत्महत्या केली असून सहावा आरोपी बालगुन्हेगार असल्यानं त्याला कोर्टानं याआधीच तीन वर्षांची शिक्षा ठोठावली गेली आहे.

दक्षिण दिल्लीतील वसंत विहार भागात ही घटना घडली होती. घरी परतणाऱ्या एका २३ वर्षीय पॅरामेडिकल विद्यार्थिनीवर आणि तिच्या मित्रावर चालत्या बसमध्ये हल्ला झाला होता. या तरुणीवर बलात्कार करून, तसंच तिच्या मित्राला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण करून रस्त्यावर फेकण्यात आलं होतं. या घटनेनंतर काही दिवसांनी सिंगापूरमधील रुग्णालयात उपचार सुरू असताना पीडित तरुणीचा मृत्यू झाला. या प्रकरणी बसचालकासह सहा नराधमांना अटक करण्यात आली होती. पीडित तरुणीला उपचार मिळण्यात झालेला विलंब आणि हॉस्पिटलात उपचार सुरू असताना झालेलं इन्फेक्शन यामुळं तिचा मृत्यू झाल्याचा आरोपींचा दावा कोर्टानं फेटाळला होता.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.