दिल्ली गँगरेप : सोशल साईटसवर सूचना-प्रतिक्रियांचा पाऊस

दिल्लीत चालत्या बसमध्ये तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या प्रकरणानं सगळा देशच जणू हादरलाय. सोशल वेबसाईटवरच्या विविध स्तरांतील, विविध क्षेत्रातील प्रतिक्रिया पाहून राग आणि संताप दिसून येतोय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Dec 19, 2012, 12:47 PM IST

www.24taas.com, मुंबई
दिल्लीत चालत्या बसमध्ये तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या प्रकरणानं सगळा देशच जणू हादरलाय. सोशल वेबसाईटवरच्या विविध स्तरांतील, विविध क्षेत्रातील प्रतिक्रिया पाहून राग आणि संताप दिसून येतोय.
अरविंद केजरीवाल, सदस्य, आम आदमी पार्टी
२००५ मध्ये जर्मनीच्या एका मुलीवर जोधपूरमध्ये बलात्काराची घटना घडली होती. त्यावेळी आरोपींना १६ दिवसांच्या आत शिक्षा मिळाली होती. दिल्लीच्या आरोपींना मात्र एका महिन्यानंतरही शिक्षा होत नाही... का?
किरण बेदी, सामाजिक कार्यकर्त्या
दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी संध्याकाळी पोलिसांबरोबर सिव्हिल डिफेन्स वॉलिंटियर्सची मदत घ्यायला हवी. सिव्हिल डिफेन्स डीजीपीच्या माध्यमातूनच आम्ही हजारो महिला आणि पुरुषांना प्रशिक्षित केलं होतं. मोबाईल क्राईम थांबायलाच हवं... सिटीजन वार्डन, सिव्हिल डिफेन्स, संयुक्त पेट्रोलिंग सिस्टम पुन्हा एकदा वापरात यायला हवं.
संजय राऊत, सदस्य, राज्यसभा
असंच सुरू राहिलं तर लवकरच हिंदुस्तानचं नाव ‘रेपिस्तान’ होईल.
रुपा सुब्रह्मण्यम, वॉल स्ट्रीट जर्नल
जया बच्चन यांनी संसदेत अश्रू ढाळले पण त्यांच्यासारख्या खासदारांनी सार्वजनिक गाड्यांमधून प्रवास करायला हवा, तेव्हा त्यांना खरं रुप दिसेल.
स्मृती इराणी
दिल्ली आता गुन्ह्यांची राजधानी बनलीय. राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये कायद्यांची अवस्था तर फूटबॉलसारखी झालीय.
रवीना टंडन, अभिनेत्री
वर्तमानपत्र उघडताच हत्या, ५ वर्षांपासूनच्या मुलींवर बलात्काराच्या बातम्या वाचायला मिळतात. मुलींना कँसरसारख्या उपचारापासून दूर ठेवलं जातं कारण मुलींवर खर्च करण्याची लोकांची मानसिकता नसते. साहजिकच हे स्पष्ट होतंय की मुली या लोकांना नकोत. मग, अशी लोक आपल्या मुलींना सुरक्षितता तरी कशी काय देऊ शकतात. जेव्हापर्यंत आपले कायदे सशक्त होणार नाहीत, तेव्हापर्यंत हत्यारे आणि बलात्कारी व्यक्ती कायद्यापासून पळवाटा काढतच राहतील. अशा लोकांना फाशीवर लटकवायला हवं.

सलमान खान, अभिनेता
दिल्ली गँगरेप प्रकरणातल्या आरोपींना जन्मभर कोठडीत डांबून ठेवायला हवं... तसंच अशा घटना घडत असताना काहीही न करता बघ्याची भूमिका घेणाऱ्या किंवा मोबाईल शूट करणाऱ्या व्यक्तींनाही कठिण शिक्षा व्हायला हवी. आपल्यातल्या प्रत्येकानं दबंग व्हायची वेळ आलीय.
गुलजार
नाखून से तराशे जो खून के धब्बे हैं, खामोश चीखों उनमें कई कैद पड़ी है, एक बार फिर। मर्दानगी को तुमने तो मजमा बना दिया, अब दोजख में भी दो गज जमीन ना मिलेगी, एक बार फिर।
फरहान अख्तर, दिग्दर्शक – अभिनेता
आपण दुबळ्यांना सहज वाकायला लावू शकतो. दिल्ली बस गँगरेपनं हे स्पष्ट केलंय की न्याय झोपलाय.
कबीर बेदी, अभिनेते
बलात्कार कराल, तर जेलमध्ये जाल हा भारताचा नाराच असायला हवा.
फराह खान, दिग्दर्शिका
मला असं कित्येक वेळा वाटतं की भारतात शरियत कायदाच चांगलं काम करू शकेल. असं केल्यानं बलात्कार करणाऱ्यांना नपुंसक बनवण्यामुळे समाजात एक चांगलाच संदेश मिळू शकेल.
जुही चावला, अभिनेत्री
वर्तमानपत्रात दिल्लीच्या सामूहिक बलात्काराची हृद्यविदारक बातमी वाचली आणि स्तब्ध झाले. मी त्या पीडित मुलगी आणि तिच्या परिवाराबरोबर आहे. ज्या व्यक्तींनी हे घृणास्पद कृत्य केलंय त्यांना दोषी ठरवलं जाऊन लवकरात लवकर आणि सार्वजनिकरित्या शिक्षा होईल, अशी मी आशा करते.
गुल पनाग, अभिनेत्री
दिल्ली सरकारला खरंच सगळ्या बलात्कार पीडितांना न्याय मिळवून द्यायचाय तर फास्ट ट्रॅक कोर्टात या खटल्यांची सुनावणी व्हावी आणि जास्तीत जास्त ६० दिवसांच्या आत खटल्यांचा निकाल लावला जावा.
अर्जुन रामपाल, अभिनेता
बलात्काराच्या घटना थांबवण्यासाठी सर्वात योग्य मार्ग म्हणजे या बलात्काऱ्यांना सगळ्या लोकांसमोर चाबकानं फोडून काढायला हवं. आता आणखी दया नको
प्रीतीश नंदी, सिनेनिर्माता
ज्या लोकांमध्ये आत्मसन्मान आहे त्यांनी दिल्ली बलात्कार अशी प्रकरणं थांबवण्यात आपण कमी पडलो हे मान्य करून त्वरीत राजीनामा द्यायला हवा.