`वैतागलेल्या केजरीवालांना हवंय राजीनाम्यासाठी निमित्त`

दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा काटेरी मुकूट डोक्यावर चढवलेले अरविंद केजरीवाल सध्या वैतागलेत... राजीनामा देण्यासाठी ते केवळ निमित्त शोधत आहेत, असं म्हणत किरण बेदी यांनी केजरीवाल यांच्यावर हल्ला चढवलाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jan 21, 2014, 02:23 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा काटेरी मुकूट डोक्यावर चढवलेले अरविंद केजरीवाल सध्या वैतागलेत... राजीनामा देण्यासाठी ते केवळ निमित्त शोधत आहेत, असं म्हणत किरण बेदी यांनी केजरीवाल यांच्यावर हल्ला चढवलाय.
`केजरीवाल यांनाही आता माहित झालंय की त्यांनी लोकांना दिलेली मोठ-मोठी आश्वासनं ते पूर्ण करू शकत नाहीत, त्यामुळे त्यांना राजीनामा देऊन मोकळं व्हायचंय, यासाठी ते केवळ निमित्त शोधत आहेत` असं एकेकाळच्या केजरीवाल यांच्या सहकारी किरण बेदी यांनी म्हटलंय.
दरम्यान, `आम्ही इथेच सत्तादेखील चालवू आणि आंदोलनही करू` असं म्हणत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचं धरणं आंदोलन आज दुसऱ्या दिवशीही सुरू आहे. दिल्लीत ४ पोलिसांचे निलंबन किंवा बदली करावी म्हणून केजरीवाल आणि त्यांच्या मंत्र्यांचे धरणे आंदोलन सुरु केलंय. गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना शांतपणे झोपू देणार नसल्याचं सांगत कुठल्याही वाटाघाटींशिवाय आंदोलन सुरुच राहिल असं केजरीवाल यांनी स्पष्ट केलंय.
दिल्लीतील पोलीस अधिकाऱ्यांच्या निलंबनासाठी आग्रही असलेल्या आम आदमी पक्षाचं धरणे आंदोलन रात्रभर सुरुच होते. गृहमंत्री शिंदे यांनी केजरीवाल यांना आंदोलन जंतर मंतर येथे करण्यास सांगितले होते. केजरीवाल यांनी आपले मंत्री व समर्थकांसह रात्र ही रस्त्यावरच काढली. केजरीवाल यांनी दिल्लीतील नागरिकांना कामावर न जाता आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. दिल्लीत कडाक्याची थंडी असूनही, रेल भवनजवळ रस्त्यावरच केजरीवाल यांनी निवारा घेतला. या आंदोलनामुळे दिल्लीचे दोन मेट्रो स्टेशन आजही बंद ठेवण्यात आली आहेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.