दर महिन्याला वाढणार डिझेलच्या किंमती!

महागाईनं त्रस्त जनतेला आणखी एक दणका बसणार आहे.. डिझेलचे दर आता महिन्याला वाढणार आहेत. प्रति महिना ४० ते ५० पैशांची दरवाढ होणार असल्याची माहिती पेट्रोलियम मंत्री वीरप्पा मोईली यांनी दिलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Feb 1, 2013, 02:15 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
महागाईनं त्रस्त जनतेला आणखी एक दणका बसणार आहे.. डिझेलचे दर आता महिन्याला वाढणार आहेत. प्रति महिना ४० ते ५० पैशांची दरवाढ होणार असल्याची माहिती पेट्रोलियम मंत्री वीरप्पा मोईली यांनी दिलीय. पुढील सूचना मिळेपर्यंत ही दरवाढ होणार असल्याचंही पेट्रोलियम मंत्र्यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळं महागाईच्या वणव्यात होरपळणाऱ्या जनतेला दणका बसलाय.
भारतीय अर्थव्यवस्थेची स्थिती सुधारण्याच्या हेतूनं अर्थ मंत्री पी. चिदंबरम यांनी केळकर समिती स्थापन केली होती. या समितीनं आपल्या अहवालात डिझेल आणि केरोसीनचे भाव वाढवण्याची सूचना केली होती. यामुळे इंधन सबसिडी खर्चात तब्बल १,६३,००० करोड रुपयांची कपात होऊ शकेल, असं या समितीचं म्हणणं आहे. अहवालात नमूद केल्याप्रमाणे डिझेलच्या दरात ९.२८ रुपये प्रति लीटर वाढ अपेक्षित होती.

समितीच्या या सूचनेनंतर, केंद्र सरकारनं पेट्रोल तसंच डिझेलच्या किंमतींना सरकारी नियंत्रणातून मुक्त केलं आणि आता पेट्रोलियम मंत्रालयानं, प्रत्येक महिन्याला डिझेलची किंमत ४० ते ५० पैसे प्रति लीटर वाढवण्याचा निर्णय घेतलाय. या वाढीसंदर्भात प्रत्येक महिन्याला कोणतीही अधिकृत घोषणा केली जाणार नाही. परंतू, या निर्णयाशिवाय इतर निर्णय घेतले गेले, तर त्याची सूचना सरकारकडून नागरिकांना देण्यात येणार आहे.