आधी शौचालय, मग देवालय! - नरेंद्र मोदी

प्रखर हिंदुत्वासाठी प्रसिद्ध असलेले भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी काहीसा वेगळा सूर लावला आहे. दिल्लीमध्ये तरुणांशी संवाद साधताना `पहले शौचालय, फिर देवालय` असं सांगत राम मंदिरापेक्षा विकासाला आपलं प्राधान्य असल्याचं मोदींनी सूचित केले आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Oct 3, 2013, 04:30 PM IST

www.24taas.com , वृत्तसंस्था, नवी दिल्ली
प्रखर हिंदुत्वासाठी प्रसिद्ध असलेले भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी काहीसा वेगळा सूर लावला आहे. दिल्लीमध्ये तरुणांशी संवाद साधताना `पहले शौचालय, फिर देवालय` असं सांगत राम मंदिरापेक्षा विकासाला आपलं प्राधान्य असल्याचं मोदींनी सूचित केले आहे.
२१व्या शतकातही महिलांना उघड्यावर शौचाला जावं लागतं, ही देशासाठी अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. देवालयापेक्षाही शौचालय बांधणं अधिक महत्त्वाचं आहे. गावांमध्ये देवालयांवर लाखो रुपये खर्च केले जातात, पण महिलांना शौचासाठी उघड्यावर जावे लागते हे दुर्दैवी आहे, असे मोदींनी धाडसी वक्तव्य केले.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदींनी सध्या जाहीर सभा घेण्यावर भर दिला आहे. जाहीर सभेत काँग्रेसवर ते तोंडसुख घेत आहेत. नवी दिल्ली या राजधानीतल्या त्यागराज स्टेडियममध्ये झालेल्या `मंथन` कार्यक्रमात त्यांनी युवकांची मनं जिंकण्याचा प्रयत्न केला. या कार्यक्रमात मोदींनी एक महत्त्वाचा नारा दिला. आधी शौचालय, मग देवालय!
दरम्यान, मोदींच्या या विधानावर आता संघ परिवारातून प्रतिक्रिया यायला सुरूवात झाली आहे. ज्येष्ठ भाजप स्वयंसेवक मा. गो. वैद्य यांनी देवालय आणि शौचालय हे दोन्ही वेगळे आणि तितकेच महत्त्वाचे विषय असल्याचं म्हटले आहे. तर भाजप नेते विनय कटियार यांनी मोदींच्या विधानात काहीही चूकीचं नसल्याचं म्हटले आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.