सोनं महागलं... आयात करात वाढ!

महागाईच्या जमान्यात मन खट्टू करणारी आणखी एक बातमी... सोनं खरेदी करणं दिवसेंदिवस सामान्यांच्या अवाक्याबाहेर चाललंय. आता, सोन्यावरचं आयात शुल्क वाढवण्यात आलंय त्यामुळे सोन्याच्या किंमतीत आणखी वाढ झालीय

www.24taas.com, नवी दिल्ली
महागाईच्या जमान्यात मन खट्टू करणारी आणखी एक बातमी... सोनं खरेदी करणं दिवसेंदिवस सामान्यांच्या अवाक्याबाहेर चाललंय. आता, सोन्यावरचं आयात शुल्क वाढवण्यात आलंय त्यामुळे सोन्याच्या किंमतीत आणखी वाढ झालीय
आयात शुल्क आता चार टक्क्यांवरून आता सहा टक्के करण्यात आलंय आणि या निर्णयाचं तात्काळ अंमलबजावणीही करण्यात आलीय. त्यामुळं सोनं आणखी महागलंय. चालू खात्यांवर होत असलेला परिणाम थोपण्यासाठी या धातूंवरील आयात करांत वाढ करण्यात आलीय. सरकारकडून गोल्ड एक्सचेन्ज ट्रेडेड फंड (ईटीएफ)ला सोन्याच्या जमा योजनेमध्ये जोडण्याचा विचारही केला जातोय. यामुळे म्युच्युअल फंड आपल्या सोन्याला बँकांच्या सोन्याच्या विविध योजनांमध्ये गुंतवणूक करता येईल.

सोन्याप्रमाणेच प्लॅटीनमच्या दागिन्यांनाही बाजारात खूप मागणी आहे. मात्र आता प्लॅटीनमच्या दागिन्यांसाठीही जास्त पैसे मोजावे लागतील. प्लॅटीनमचं आयातशुल्कही चार टक्क्यांवरून सहा टक्क्यांवर नेण्यात आलंय. त्यामुळे आता लग्नसराईला दागिने खरेदी करणं खूपच खर्चिक झालंय. या निर्णयाची घोषणा झाल्यानंतर दिल्लीमध्ये सोन्याच्या किंमतीत ३१५ रुपयांनी वाढ होऊन सोनं ३१,२५० रुपये प्रति १० ग्रॅम झालंय.