दिल्ली मुख्यमंत्रीपदासाठी भाजपकडून हर्ष वर्धनांचे नाव

दिल्ली काबीज करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने जोरदार बांधनी केली आहे. मात्र, दिल्लीत अंतर्गत कलहाचे पडसादही पाहायला मिळालेत. १३ जिल्ह्यातील भाजप नेत्यांनी आपले राजीनामे देण्याचे अस्त्र बाहेर काढले आहे. हा वादंग माजी अध्यक्ष नितीन गडकरींच्या विरोधात असल्याचे दिसून आलेय. दरम्यान, आज विधानसभा निवडणुकीत दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदासाठी भाजपकडून डॉ. हर्ष वर्धन यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Oct 23, 2013, 02:16 PM IST

www.24taas.com, वृत्तसंस्था, नवी दिल्ली
दिल्ली काबीज करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने जोरदार बांधनी केली आहे. मात्र, दिल्लीत अंतर्गत कलहाचे पडसादही पाहायला मिळालेत. १३ जिल्ह्यातील भाजप नेत्यांनी आपले राजीनामे देण्याचे अस्त्र बाहेर काढले आहे. हा वादंग माजी अध्यक्ष नितीन गडकरींच्या विरोधात असल्याचे दिसून आलेय. दरम्यान, आज विधानसभा निवडणुकीत दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदासाठी भाजपकडून डॉ. हर्ष वर्धन यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंह यांनी हर्ष वर्धन यांच्या नावाची घोषणा केली. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांनी हर्षवर्धन यांचे अभिनंदन केले. तसेच त्यांनी विधानसभा निवडणुकीत भाजपचाच विजय होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
आज झालेल्या भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत यावर निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवारीवरून दिल्ली भाजपमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होते. अखेर विजय गोयल यांनी आपले नाव या पदाच्या शर्यतीतून मागे घेतल्याने हर्षवर्धन यांची या पदासाठी घोषणा होण्याचे जवळपास निश्चित झाले.
आगामी विधानसभा निवडणुकांपूर्वीच मुख्यमंत्रीपदासाठी पक्षात वादविवाद वाढू लागल्याने भाजपमध्ये चिंतेचे वातावरण होते. पण, विजय गोयल यांच्या माघारीमुळे आता अंतर्गत कलह संपुष्टात आल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, दिल्लीत आम आदमी पक्षाचे वाढते वजन पाहता, याचा फटका भाजपला बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे भाजपने नव्या नेत्याचे नाव जाहीर केल्याचे म्हटले जात आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.