पत्नीच्या मृत्यूनंतर संपत्तीवर पतीचा हक्क नाही, सुप्रीम कोर्टाचा निर्णय

विवाहानंतर पत्नीचा संशयास्पदरित्या मृत्यू झाला तर तिचा पती किंवा सासरकडील मंडळी तिच्या संपत्तीवर - स्त्री धनावर हक्क सांगू शकत नाहीत, असा महत्त्वाचा निर्णय सुप्रीम कोर्टानं दिलाय. 

Updated: Jan 21, 2016, 12:43 PM IST
पत्नीच्या मृत्यूनंतर संपत्तीवर पतीचा हक्क नाही, सुप्रीम कोर्टाचा निर्णय title=

नवी दिल्ली : विवाहानंतर पत्नीचा संशयास्पदरित्या मृत्यू झाला तर तिचा पती किंवा सासरकडील मंडळी तिच्या संपत्तीवर - स्त्री धनावर हक्क सांगू शकत नाहीत, असा महत्त्वाचा निर्णय सुप्रीम कोर्टानं दिलाय. 

लग्नानंतर सात वर्षांच्या आत जर एखाद्या महिलेचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला तर तिच्या संपत्तीवर तिच्या मुलांच्या हक्क राहील. मुलं नसतील तर तिची ही संपत्ती तिच्या माहेरच्या मंडळींकडे दिली जाईल, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिलाय. 

याच वेळी, पत्नीचा मृत्यू सामान्य परिस्थितीत झाला असेल तर पती-सासरकडील मंडळी तिच्या संपत्तीवर दावा करू शकतात, असं देखील न्यायालयानं स्पष्ट केलंय. 

हुंडा दिला असेल तर...

हुंडा प्रतिबंधक कायद्यानुसार, लग्नानंतर तीन महिन्यांच्या आतमध्ये हुंड्यात मिळालेल्या सगळ्या वस्तू - पैसे वधूकडे सुपूर्द केले पाहिजे. पती किंवा सासरकडील मंडळींनी तिच्या चल-अचल संपत्ती तिच्याकडे सुपूर्द केली नाही तर त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाऊ शकतो.

काय होतं प्रकरण... 

एका व्यक्तीनं दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयानं हा निर्णय दिलाय. या प्रकरणात महिलेचा संशयास्पदरित्या मृत्यू झाला होता... आणि तिच्या पतीनं तिच्या संपत्तीवर दावा दाखल केला होता. ही संपत्ती तिच्या माहेरच्या मंडळींना न देता आपल्याला देण्यात यावी, अशी त्याची मागणी होती. न्यायालयानं या व्यक्तीचा दावा मोडीत काढलाय.