दलित विद्यार्थ्याची आत्महत्या; राजकीय रंग देण्याचा प्रयत्न सुरू

हैदराबाद सेंट्रल युनिव्हसिटीतल्या दलित विद्यार्थ्यांच्या आत्महत्येला आता राजकीय रंग चढलाय. 

Updated: Jan 19, 2016, 10:13 AM IST
दलित विद्यार्थ्याची आत्महत्या; राजकीय रंग देण्याचा प्रयत्न सुरू title=

हैदराबाद : हैदराबाद सेंट्रल युनिव्हसिटीतल्या दलित विद्यार्थ्यांच्या आत्महत्येला आता राजकीय रंग चढलाय. 

रोहित वेमूला या विद्यार्थ्यानं गळफास लावून आत्महत्या केली होती. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी हैदराबाद केंद्रीय विद्यापीठाचा दौरा करणार आहेत. यावेळी ते विद्यार्थ्यांशी चर्चा करणार आहेत.

या प्रकरणात केंद्रीय मंत्री आणि हैदराबादचे भाजप खासदार बंडारु दत्तात्रय यांच्यावर अॅट्रॉसिटी आणि आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यामुळं दत्तात्रय यांच्या राजीनाम्यासाठी राहुल गांधी आणि काँग्रेस आक्रमक होण्याची चिन्हं आहेत. 

याच मागणीसाठी एनएसयूआयनं सोमवारी शास्त्री भवनपर्यंत मार्च काढून मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी या प्रकरणी हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली होती. 

का केली रोहितनं आत्महत्या?

'अभाविप'च्या कार्यकर्त्याला मारहाण केल्याच्या आरोपावरुन २६ वर्षीय रोहितला निलंबित करण्यात आलं होतं. यामुळेच त्यानं गळफास लावून आत्महत्या केल्याचं सांगितलं जातंय. याप्रकरणी द्विसदस्यीय चौकशी समिती गठीत करण्यात आलीय.

पीएचडी करत असलेल्या रोहितचं शव केंद्रीय विद्यापीठाच्या विद्यार्थी कक्षात फाशीला लटकलेल्या अवस्थेत आढळलं होतं. रोहितसोबत आणखीन चार विद्यार्थ्यांचं गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात निलंबन करण्यात आलं होतं. त्यानंतर हे निलंबन परत घेण्यात आलं होतं.