`भारतात उपस्थित ४० दहशतवाद्यांचा विमान अपरणाचा कट`

सूत्रांच्या माहितीनुसार, सध्या देशात इंडियन मुजाहिद्दीनचे ३०-४० दहशतवादी उपस्थित असल्याचं भटकळनं कबूल केलंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Sep 5, 2013, 12:02 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
‘इंडियन मुजाहिद्दीन’चा (आयएम) म्होरक्या आणि सह-संस्थापक यासीन भटकळ सध्या चौकशीमध्ये तपास यंत्रणेसमोर एक एक माहिती उघड करतोय. सूत्रांच्या माहितीनुसार, सध्या देशात इंडियन मुजाहिद्दीनचे ३०-४० दहशतवादी उपस्थित असल्याचं भटकळनं कबूल केलंय.
याअगोदर, भारतात अनेक दहशतवादी कारवायांना मूर्त स्वरुप देण्याचे कट आखले जात असल्याचं भटकळनं तपास यंत्रणांना माहिती दिली होती. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात हैदराबादमध्ये बॉम्बस्फोट करण्यासाठी त्याला पाकिस्तानी सूत्रधारांकडून आदेश मिळाले होते. अमेरिकेत झालेल्या ९/११च्या हल्ल्याप्रमाणेच भारतात धुमाकूळ उडवून देण्याच्या प्रयत्नात इंडियन मुजाहिद्दीन असल्याचं भटकळनं सांगितलंय. दिल्ली आणि मुंबईसारख्या मोठ्या विमानतळावरून छोटे विमानं हायजॅक करून त्यांच्यासाहाय्यानंच बॉम्बस्फोट घडविण्याचा कट रचला जात असल्याचंही त्यानं म्हटलंय.
देशात ठिकठिकाणी आयएमचे अनेक दहशतवादी लपून बसलेले आहेत. प्रत्येक दहशतवाद्याला खास काम सोपवलेलं आहे आणि ते आपली जबाबदारी योग्य पद्धतीनं पार पाडण्याच्या प्रयत्नात आहेत. यासिनच्या म्हणण्यानुसार देशात आजघडीला ४० दहशतवादी उपस्थित आहेत.
विमानं हायजॅक करण्यासाठी आयएमच्या दहशतवाद्यांकडून काही विमानतळांची रेकीही करण्यात आलीय. फोटो आणि व्हिडिओच्या माध्यमातून याबद्दलची माहिती कराचीमध्ये बसलेल्या रियाज आणि इक्बाल भटकळपर्यंत पोहचवण्यात आलीय.
सूत्रांच्या माहितीनुसार, भटकळनं या सर्व दहशतवाद्यांना पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआय आणि पाक सेनेच्या आठ अधिकाऱ्यांनी ट्रेनिंग दिलंय. ३० ते ४० दहशतवाद्यांपैकी नऊ दहशतवादी महाराष्ट्रातील ग्रामीण भागात पोहचलेले आहेत. आयएसआयच्या आदेशाची वाट हे दहशतवादी पाहत आहेत.

देशातील दुर्गम भागातील तरुणांना फूस लावून इंडियन मुजाहिद्दिन आयएसआयसाठी काम करण्यास प्रोत्साहित करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यांना पाकिस्तान ट्रेनिंगसाठी पाठवत होतं आणि त्यानंतर पाकिस्तानात परतल्यानंतर त्यांना विविध हल्ल्यांच्या रणनीतीमध्ये सहभागी करून घेतलं जात होतं. केवळ एका वर्षात देशात वेगवेगळ्या शहरांना बॉम्बस्फोटांनी हादरवून टाकण्यासाठी हवालाच्या माध्यमातून पैसे पाठवले गेले आहेत, अशी माहितीही भटकळनं चौकशी यंत्रणांना दिलीय.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.