'मी यासिन भटकळ नाहीच'

दहशतवादी यासिन भटकळ याला नेपाळहून अटक केल्यानंतर आज दिल्लीत आणण्यात आलंय. बिहार पोलिसांनी अटक केल्यानंतर एनआयएची टीम भटकळला दिल्लीत घेऊन आली.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Aug 30, 2013, 06:14 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
दहशतवादी यासिन भटकळ याला नेपाळहून अटक केल्यानंतर आज दिल्लीत आणण्यात आलंय. बिहार पोलिसांनी अटक केल्यानंतर एनआयएची टीम भटकळला दिल्लीत घेऊन आली. दिल्लीतल्या पतियाला हाऊस कोर्टात भटकळला हजर करण्यात आलं. यावेळी भटकळला १२ दिवसांची एनआयए रिमांड देण्यात आली आहे. विशेष म्हणजे कोर्टात भटकळने मी यासीन भटकळ नाहीच असा दावा केला.
याआधी, अटक झाल्यानंतर यासिनने विविध दहशतवादी कारवायांची कबुली दिली होती. त्याला त्याच्या कोणत्याही कृत्याचा पश्चात्ताप नाही. उलट त्याने त्याच्या कृत्यांचं समर्थन करत बढायाच मारल्या होत्या.
...अशी झाली यासिन भटकळला अटक
यासीन भटकळला झालेली अटक हे गुप्तचर यंत्रणांचं मोठं यश मानलं जात आहे. अत्यंत थरारकरित्या नेपाळच्या पोखरा इथून त्याला अटक झाली. क्रूरकर्मा यासीन भटकळ हा तपास यंत्रणांसाठी मोस्ट वाँटेड होता, त्यामुळे त्याच्या मागावर भारताच्या गुप्तहेर यंत्रणा होत्याच. गेल्या काही आठवड्यापासून भटकळ गुप्तचरांच्या रडारवर आला होता.

गेल्या आठवड्यात यासीन भटकळची टीप मिळाली. एका खबऱ्याने दिली त्याच्या पोखऱ्यामधल्या घराचा पत्ता आणि फोननंबर गुप्तहेर यंत्रणांना दिली. त्याचा फोन ट्रॅक व्हायला सुरूवात झाली होती. आयबीने ही माहिती तातडीने नेपाळ पोलिसांना दिली. नेपाळ पोलिसांनी त्याला पोखरा हाऊसमध्ये ट्रॅक केलं. आणि गुरूवारी, म्हणजेच भारताच्या गुप्तहेर यंत्रणांच्या नेतृत्वाखाली झालेल्या कारवाईत २९ तारखेला त्याला अटक करण्यात आली. ऑपरेशन भटकळ अशा रितीने थरारकरित्या पूर्ण झालं.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.