भारतीय सैन्याला दिसल्या १००हून जास्त `यूएफओ`

By Jaywant Patil | Last Updated: Tuesday, November 6, 2012 - 21:15

www.24taas.com, श्रीनगर
जम्मू काश्मीर आणि पूर्वोत्तर भागात चीनच्या सीमेलगत असलेल्या सैनिकांनी गेल्या तीन महिन्यांमध्ये १००हून जास्त उडत्या तबकड्या पाहिल्याचं सांगितलं आहे. लष्कर, डीआरडीओ, एनटीआरओ आणि आयटीबीपी सारख्या अनेक संस्थांनी प्रयत्न करूनही या चमकत्या तबकड्यांचं रहस्य उलगडलेलं नाही.
सैन्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं, की कारगील-लेह लगतच्या भागांमध्ये तैनात असलेल्या १४ सैनिकांनी यासंदर्भात रिपोर्ट पाठवला आहे. ठाकोंगमधील पांगोंग सो सरोवराजवळ आयटीबीपीने एक य़ूएफओ पाहिलं आहे. रिपोर्टनुसार ही तबकडी चीनच्या दिशेने येत हळुहळू आकाशाकडे जात तीन ते पाच तासात अदृश्य होत होती.
लष्करी अधिकाऱ्यांनीही या गोष्टीला दुजोरा दिला आहे. या तबकड्या उपग्रह किंवा चीनी विमानं नाहीत, याची खात्री पटली आहेत. या तबकड्या ओळखण्यासाठी रडार उपकरणंही वापरली गेली. मात्र त्यांचाही काही उपयोग झाला नाही. रडारवरूनही या तबकड्यांची कुठली माहिती मिळू शकली नाही. या तबकड्यांची ओळख न पटू शकल्यामुळे लष्करी अधिकाऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. बऱ्याच जणांना असं वाटतंय की चीनच भारताची टेहळणी करण्यासाठी हे उपकरण वापरत आहे.

First Published: Tuesday, November 6, 2012 - 21:15
comments powered by Disqus