... तर `हिंदू राष्ट्रवादी` मोदींना निवडणुकीस मज्जाव!

स्वत:ला ‘हिंदू राष्ट्रवादी’ म्हणवून घेणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेद्वार आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींना जम्मू-काश्मीर हायकोर्टानं चांगलंच फटकारलंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Oct 12, 2013, 10:02 PM IST

www.24taas.com, वृत्तसंस्था, नवी दिल्ली
स्वत:ला ‘हिंदू राष्ट्रवादी’ म्हणवून घेणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेद्वार आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींना जम्मू-काश्मीर हायकोर्टानं चांगलंच फटकारलंय.
हायकोर्टाच्या म्हणण्यानुसार, या विचाराला भारतात कोणतीही जागा नाही आणि कोणतीही व्यक्ती आपण हिंदू राष्ट्रवादी किंवा मुस्लिम राष्ट्रवादी असण्याचा दावा करू शकत नाही. आणि असा दावा करणाऱ्यांना कोणतीही निवडणूक लढण्यास मज्जाव करायला हवा, असंही न्यायालयानं म्हटलंय.
हायकोर्टाच्या म्हणण्यानुसार, स्वत:ला कोणत्याही पद्धतीनं धार्मिक राष्ट्रवादी म्हणवून घेणाऱ्या व्यक्तीला यापुढे कायद्याच्या भाषेतच समज द्यायला हवी. नरेंद्र मोदी यांचं नाव न घेता न्यायाधीश मुजफ्फर हुसैन अत्तर यांनी गुरुवारी हे स्पष्टीकरण दिलंय. आपल्या संविधानानुसार भारताचा नागरिक केवळ भारतीय असतो. कोणतीही व्यक्ती आपण हिंदू, मुस्लिम, शीख, बौद्ध किंवा ख्रिश्चन ‘राष्ट्रवादी’ असल्याचा दावा करू शकत नाही. संविधानाच्या आत्म्यातच हे स्पष्ट केलं गेलंय. न्यायाधीशांच्या मते, भारतीयत्वाच्या शिवाय इतर दुसऱ्या पद्धतीचे वाद किंवा विचारांना खतपाणी घालणाऱ्या बाहेरच्या शक्तींचा भारताला गंभीर धोका आहे.
यावेळी, धार्मिक राष्ट्रवादाला पसरवण्याचा प्रयत्न करून निवडणूकीत जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश हायकोर्टानं केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाला दिलेत.

काही दिवसांपूर्वी, जुलै महिन्यात नरेंद्र मोदींनी आपण हिंदू राष्ट्रवादी असल्याचा दावा केला होता. यावेळी आपण जन्मानं हिंदू असल्यानं आपण हिंदू राष्ट्रवादी असल्याचं मोदींनी म्हटलं होतं. ‘मी राष्ट्रवादी आहे. देशभक्त आहे... यामध्ये काहीही चूक नाही... मी हिंदू घरात जन्म घेतलाय... यातही काही चूक नाही... त्यामुळे मी हिंदू राष्ट्रवादी आहे’ असं मोदींनी म्हटलं होतं.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.