शपथग्रहण सोहळ्यासाठी 'आम आदमी'सोबतच मोदींनाही आमंत्रण

दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा सादर केल्यानंतर जवळपास एक वर्षानंतर आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल १४ फेब्रुवारी रोजी रामलीला मैदानात पुन्हा एका दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथग्रहण करणार आहेत.

Updated: Feb 11, 2015, 01:27 PM IST
शपथग्रहण सोहळ्यासाठी 'आम आदमी'सोबतच मोदींनाही आमंत्रण title=

नवी दिल्ली : दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा सादर केल्यानंतर जवळपास एक वर्षानंतर आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल १४ फेब्रुवारी रोजी रामलीला मैदानात पुन्हा एका दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथग्रहण करणार आहेत.

आपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आम आदमी पार्टी रामलीला मैदानात शपथ ग्रहण सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रण धाडणार आहे. सोबतच दिल्लीतील सर्व सात खासदारांनाही या सोहळ्यासाठी आमंत्रण दिलं जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शपथ ग्रहण सोहळ्यासाठी सामाजिक कार्यकर्ते अन्ना हजारे आणि भाजप नेत्या किरण बेदी यांनाही आमंत्रण दिलं जाणार आहे. 

दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपच्या दमदार विजयानंतर आप नेते आशुतोष यांनी ही माहिती दिली. केजरीवाल १४ फेब्रुवारी रोजी रामलीला मैदानात दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी शपथ घेणार आहेत. आम आदमी पार्टीनं दिल्ली विधानसभेतील ७० पैंकी ६७ जागांवर विजय मिळवलाय. 

तसंच, केजरीवाल यांनी येत्या शनिवारी रामलीला मैदानात होणाऱ्या शपथ ग्रहण सोहळ्यासाठी 'आम आदमी'लाही आमंत्रण दिलंय. मंगळवारी सायंकाळी एफएम रेडिओवर जाहीर करण्यात आलेल्या एका जाहिरातीत 'आप' प्रमुख केजरीवाल यांनी सामान्य जनतेला या सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याची विनंती केलीय. आपल्या मंत्र्यांसोबत अरविंद केजरीवाल १४ फेब्रुवारी रोजी शपथ ग्रहण करणार आहेत.

'तुम्हाला तुमचा अधिकार देणं हे माझं कर्तव्य आहे. कृपया, रामलीला मैदानात शपथ ग्रहण सोहळ्यात सामील व्हा, कारण मी मुख्यमंत्री होणार आहे. तुम्ही सगळेच मुख्यमंत्री होणार आहात.  मग, तुम्ही रामलीला मैदानात येणार ना?' असं आर्जव केजरीवाल यांनी रेडिओवरून केलंय. 'आम्ही लोक दिल्लीला उत्तम बनवण्याची शपथ घेणार आहे. आम्ही आम आदमीला आनंद परत मिळवून देण्याची शपथ घेतोय... कृपया, जरुर या कारण मी तुमचाच आवाज आहे, जय हिंद' असं केजरीवाल यांनी म्हटलंय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.