‘केरन’ऑपरेशन संपलं, घुसखोरी मागे पाकिस्तानच- लष्करप्रमुख

केरन ऑपरेशन संपलं असून भारताच्या जवानांनी पाकिस्तानचे दात त्याच्याच घशात घातल्याचं मंगळवारी भारतीय लष्कर प्रमुख विक्रम सिंह यांनी स्पष्ट केलं. शिवाय पाकिस्तानच्या मदतीशिवाय दहशतवादी घुसखोरी करुच शकत नाही, असं स्पष्ट करत यामागे पाकचाच हात असल्याचे संकेत लष्करप्रमुखांनी दिले.

| Updated: Oct 9, 2013, 01:15 PM IST

www.24taas.com, वृत्तसंस्था, श्रीनगर/नवी दिल्ली
केरन ऑपरेशन संपलं असून भारताच्या जवानांनी पाकिस्तानचे दात त्याच्याच घशात घातल्याचं मंगळवारी भारतीय लष्कर प्रमुख विक्रम सिंह यांनी स्पष्ट केलं. शिवाय पाकिस्तानच्या मदतीशिवाय दहशतवादी घुसखोरी करुच शकत नाही, असं स्पष्ट करत यामागे पाकचाच हात असल्याचे संकेत लष्करप्रमुखांनी दिले.
कारगिलमधील फसलेल्या मोहिमेनंतर पाकिस्तानकडून प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात घुसखोरी करण्याचं कारस्थान रचण्यात आलं होतं. जवळपास १४ दिवस सुरू असलेल्या या कारवाईत भारतीय जवानांनी ४० दहशतवाद्यांना पिटाळलं असून सात दहशतवाद्यांना कंठस्थान घातलं.
मंगळवारी हिंडन इथं एअर फोर्स डेच्या सेलिब्रेशनसाठी आलेले लष्करप्रमुख पत्रकारांसोबत बोलतांना म्हणाले, की “घुसखोरीचा हा एक अयशस्वी प्रयत्न होता. सर्व दहशतवादी नाल्यात लपलेले होते. त्यातल्या सात जणांना मारण्यात यश आलंय. तसंच त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही हस्तगत करण्यात आलाय. हे सर्व दहशतवादी एलओसीपासून ३०० ते ४०० मीटर आत घुसले होते. या घटनेमुळं १९९९मधील कारगिलच्या आठवणी ताज्या झाल्या”.
अशा प्रकारची घुसखोरी थांबविण्यासाठी आता या भागातील लष्करी व्यवस्था बळकट करण्यात आल्याचं लष्कराच्या उत्तर विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल संजीव छाचरा यांनी सांगितलं.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
पाहा व्हि़डिओ