आरुषी हत्याकांड : आणखी एका साक्षीदाराचा मृत्यू

देशभरात एकच खळबळ उडवून देणा-या आरुषी-हेमराज या दुहेरी हत्याकांडातील आणखी एका महत्त्वाच्या साक्षीदाराचा मृत्यू झालाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Sep 25, 2012, 04:06 PM IST

www.24taas.com, गाझियाबाद
देशभरात एकच खळबळ उडवून देणा-या आरुषी-हेमराज या दुहेरी हत्याकांडातील आणखी एका महत्त्वाच्या साक्षीदाराचा मृत्यू झालाय. या घटनेचे पहिले चौकशी अधिकारी जगबीर सिंह मलिक यांना काही दिवसांपूर्वी एका कारनं उडवलं होतं. या घटनेत मलिक हे गंभीर जखमी झाले होते. आज त्यांचा मृत्यू झालाय.
गाजियाबादमध्ये एका मारुती कारनं काही दिवसांपूर्वी काही लोकांना उडवलं होतं. ज्यामध्ये तीन पोलीस अधिका-यांचा मृत्यू झाला होता. या घटनेत सिंग हे जखमी झाले होते. मात्र, त्यांनी आज अंतिम श्वास घेतला.
नुपूर तलवार आणि त्यांचे पती राजेश तलवार यांच्यावर आपली मुलगी आरुषी आणि नोकर हेमराज यांच्या हत्येचा आरोप आहे. २००८ मध्ये १४ वर्षीय आरुषी आणि हेमराज यांचं शव तलवार दांपत्याच्या घरात सापडलं होतं. या प्रकरणी राजेश तलवार यांना याअगोदरच जामीन मंजूर झालाय. व्यावसायानं दातांचे डॉक्टर असलेल्या तलवार दांपत्यावर हत्या आणि पुरावे नष्ट करण्याचा आरोप आहे. तपासाला विरुद्ध दिशेत भरकटवल्याचा आरोपही या दांपत्यावर ठेवण्यात आलाय. पण, राजेश आणि नुपूर तलवार यांनी आपल्यावरील आरोप नाकारलेत.

चौकशी अधिकारी मलिक यांनी नोएडा स्थित घरातून आरुषीच्या हत्येनंतर एका आठवड्यानं तिचा संगणक जप्त केला होता. या हत्येत आरुषीचे वडील राजेश तलवार यांची भूमिका नेमकी काय होती, याचा तपास करण्यासाठी हा संगणक जप्त करण्यात आला होता.