किंग ऑफ `बॅड` टाइम्स

By Jaywant Patil | Last Updated: Saturday, October 6, 2012 - 18:05

www.24taas.com, मुंबई
किंगफिशरच्या सुमारे चार हजार कर्मचा-यांना गेल्या सहा महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. सध्याच्या घडीला किंगफिशर एअरलाईन्सच्या नुकसानाचा आकडा तब्बल 8 हजार कोटी इतका आहे. तर विविध बँकांनी दिलेल्या कर्जाचा बोजा 7 हजार कोटींचा आहे. किंगफिशरच्या ताफ्यात असलेल्या 63 विमानांपैकी आता फक्त दहाच विमानं उरली आहेत. किंगफिशरनं भाड्यानं घेतलेली विमानं परत दिलीयत. तर काही विमानांच्या भाड्याची थकबाकी असल्यानं एअरपोर्ट अथोरिटीनं त्या विमानांच्या उड्डाणाला स्थगिती दिलीय.
2005 साली एखाद्या राजासारखंच किंगफिशरचं एअरलाईन्सच्या क्षेत्रात दमदार आगमन झालं. फक्त चार विमानांच्या मदतीनं या क्षेत्रात उतरलेल्या किंगफिशरचं स्वप्न होतं दुनिया बदलवून टाकण्याचं. विजय माल्ल्यांचा मुलगा सिद्धार्थ याच्यासाठी गिफ्ट म्हणून माल्यांनी ही कंपनी सुरू केली.... आणि अल्पावधीतच विमानातले प्रवासी किंगफिशरचे गोडवे गायला लागले. पण किंगफिशरनं घेतलेले काही निर्णय चुकीचे ठरल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. त्यामध्ये सगळ्यात मोठा निर्णय होता तो एअर डेक्कनचं किंगफिशरमध्ये विलिनीकरण... मुळातच डबघाईला आलेल्या एअर डेक्कनची नुकसान भरपाई करता करता किंगफिशरचे हाल झाले आणि किंग ऑफ गुड टाईम्स म्हणून मानानं मिरवणा-या राजाचं आता दिवाळं निघालंय.
विविध कर, नियम, इंधनांचे वाढते दर, डॉलरच्या तुलनेत घसरणारा रुपया आणि नुकसान करणा-या मार्गांवरची उड्डाणं यामुळेच किंगफिशरचं दिवाळं निघाल्याचं माल्ल्यांचं म्हणणंय. किंगफिशरच्या कर्मचा-यांना सहा महिन्यांपासून पगार मिळालेला नाही, तर दुसरीकडे अचानक उड्डाणं रद्द झाल्यानं प्रवाशांचंही नुकसान झालंय.
अब्जाधीश असलेले विजय माल्या सध्याच्या घडीला एकही पैसा विमानांच्या या डुबत्या जहाजावर लावण्याच्या मनस्थितीत नाहीत. एकेकाळी किंग ऑफ गुड टाईम्स म्हणून मिरवणारं किंगफिशर सध्या बॅड टाईम्समधून जातंय. या परिस्थितीत सगळ्यात वाईट परिस्थिती येणार आहे ती किंगफिशरच्या कर्मचा-यांवर....

First Published: Saturday, October 6, 2012 - 18:05
comments powered by Disqus