काश्मिर कोणाच्या मालकीचं नाही – जेटली

By Aparna Deshpande | Last Updated: Monday, August 12, 2013 - 22:44

www.24taas.com , झी मीडिया, नवी दिल्ली
जम्मू-काश्मिरमध्ये सुरू असलेल्या जातीय दंगलींवरून राजकारण सुरू झालंय. राज्य सरकारनं केवळ बघ्याची भूमिका घेत दंगली भडकू दिल्याचा आरोप भाजपनं मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांवर केलाय.
जम्मू-काश्मिरमध्ये सुरू असलेल्या दंगलींचे संसदेत पडसाद उमटले आहेत. किश्तवाडमध्ये या जातीय दंगलीची ठिणगी पडली आणि संपूर्ण राज्यात त्याचा वणवा पेटला. आता दंगलींवरून राजकारण सुरू झाल्यानं अशिवेशनातही या दंगलींचा मुद्दा पेटलाय.
या दंगलींबाबत राज्यसभेचे विरोधी पक्षनेते अरुण जेटली यांनी मुद्दा उपस्थित करत मुख्यमंत्री अब्दुल्ला आणि केंद्र सरकारवर घणाघाती हल्ला केला. या घटनेकडे केवळ जातीय दंगली म्हणून न पाहता देशाच्या सार्वभौमत्व आणि एकात्मतेवरच हा घाला असूनही राज्य सरकारनं केवळ बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप जेटलींनी केला. तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी बसपाच्या अध्यक्षा मायावतींनी केली.
या दंगली जातीय असल्या तरी त्या भडकवण्यात दहशतवाद्यांचाच हात असल्याचं पी. चिदंबरम यांनी राज्यसभेत दिलेल्या निवदेनात नमूद केलं.

तर दुसरीकडे जम्मू आणि काश्मिरमध्येही या दंगलींवरून राजकारणाला उधाण आलंय. या दगंलीमुळं जम्मू-काश्मिरचे गृहराज्यमंत्री सज्जाद किचलू यांची विकेट गेलीय. मात्र त्यांनी राजीनामा देतानाच गोध्रा दंगलीच्या वेळी मोदी सरकारमधल्या कोणत्या मंत्र्यानं राजीनामा दिला असा सवाल भाजपला केलाय.
काश्मिरच्या सीमेवर पाकिस्तानी सैन्याचे नापाक हल्ले सुरूच आहेत. याची धग कायम असतानाच आता जम्मू काश्मिरमध्ये जातीय दंगली पेटल्या आहेत. त्यामुळं दहशतवाद्यांना हवी तशी परिस्थिती सध्या काश्मिरमध्ये निर्माण झालीय. मात्र आपल्या नेत्यांनी आगामी निवडणुकांवर डोळा ठेवून या घटनेवरून आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण सुरू केलंय, हेच यासर्व घटनांवरुन दिसून येतंय.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, August 12, 2013 - 22:44
comments powered by Disqus