मुलाच्या सुटकेसाठी कुलभूषण जाधव यांच्या आईचा आक्रोश

हेरगिरीच्या कथित आरोपावरुन पाकिस्ताननं मृत्यूदंडाची शिक्षा सुनावलेले माजी भारतीय नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसाठी त्यांच्या आई पुढे सरसावल्या आहेत.

Updated: Apr 27, 2017, 09:03 AM IST
मुलाच्या सुटकेसाठी कुलभूषण जाधव यांच्या आईचा आक्रोश title=

नवी दिल्ली : हेरगिरीच्या कथित आरोपावरुन पाकिस्ताननं मृत्यूदंडाची शिक्षा सुनावलेले माजी भारतीय नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसाठी त्यांच्या आई पुढे सरसावल्या आहेत.

आपल्या मुलाची सुटका करावी अशी मागणी करणारं पत्रं कुलभूषण जाधव यांच्या आई अवंती जाधव यांनी पाकिस्तान सरकारला लिहिलं आहे. परदेश मंत्रालयानं दिलेल्या माहितीप्रमाणे जाधव यांच्यातर्फे त्यांच्या आईची याचिकाही न्यायालयाकडे देण्यात आलेली आहे. आपल्या मुलाच्या सुटकेसाठी अवंती यांनी पाकिस्तान सरकारकडे हस्तक्षेपाची मागणी केलीय.

आपल्या मुलाची भेट घेऊ देण्याची परवानगी आपल्याला दिली जावी, अशी विनंती त्यांनी या पत्रातून केलीय. त्यांचं हे पत्र भारत सरकारनं पाकिस्तानला सुपूर्द केलं आहे.

पाकिस्तान सैन्य न्यायालयानं जाधव यांना गुप्तहेरीच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा सुनावलीय. भारताकडून करण्यात आलेल्या द्विपक्षिय करारात राजनैतिक मदत केवळ कैद्यांसाठी असते, गुप्तहेरांसाठी नाही असं म्हणत यावर चर्चेची मागणीही पाकिस्ताननं धुडकावलीय. त्यामुळे आता पाकिस्तान सरकार या पत्रावर काय भूमिका घेतंय, याकडे लक्ष लागलं आहे.