माळीण गाव... काही क्षणांत होत्याचं नव्हतं झालं!

पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यातल्या माळीण गावावर काळानं निर्दयी झडप घातली. मुसळधार पावसामुळं डोंगरकडा कोसळून माळीण गावातली 44 घरं गाडली गेली. 

Updated: Jul 30, 2014, 11:31 PM IST
माळीण गाव... काही क्षणांत होत्याचं नव्हतं झालं! title=

पुणे : पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यातल्या माळीण गावावर काळानं निर्दयी झडप घातली. मुसळधार पावसामुळं डोंगरकडा कोसळून माळीण गावातली 44 घरं गाडली गेली. या दुर्घटनेत आतापर्यंत १९ जणांचे बळी गेलेत. शिवाय सुमारे 150 गावकरी ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जातेय.

माळणी गावातल्या दुर्घटनास्थळी युद्धपातळीवर मदतकार्य सुरू आहे. एनडीआरएफच्या दोन तुकड्या मोठ्या कसोशीनं अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न करत आहेत. १०० ते १५० अँबूलन्स घटनास्थळी आहेत. तडीनं जिल्हा पोलीस प्रशासनानं जेसीबी आणि पोकलँडचा ताफा घटनास्थळी तैनात केला असून ढिगारा उपसण्याचं काम जोमानं सुरू आहे. मात्र प्रचंड पाऊस आणि चिखलामुळं मदतकार्यात अडथळे येतायत. आणखी काही जेसीबींची आवश्यकता आहे. तीन दिवस बचावकार्य चालणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिलीय. 


 

एक होतं माळीण गाव... 

आंबेगाव तालुक्यातल्या माळीण गावावर अक्षरशः दुःखाचा डोंगर कोसळला. बुधवारी पहाटे तीनच्या सुमारास गावकरी गाढ झोपेत असतानाच, काळानं गावावर घाला घातला. डोंगरकडा कोसळून त्याखाली जवळपास 44 घरं जागीच गाडली गेली... आणि सुमारे 725 वस्तीचं हे गाव होत्याचं नव्हतं झालं. डिंभे धरणामुळं विस्थापित झालेल्या लोकांचं पुनवर्सन माळीण गावात करण्यात आलं होतं. प्रामुख्यानं आदिवासी शेतक-यांची घरं गावात होती. पण निसर्गाचा कोप झाला आणि हे गाव डोंगराखाली गाडलं गेलं. केवळ घरं आणि माणसंच नाहीत, तर जनावरं आणि गावचं मंदिर देखील या आपत्तीमध्ये उद्धवस्त झालं. 

बुधवारी, पहाटे तीन वाजता ही दुर्घटना घडली. मात्र, डिंभे धरणापासून सुमारे 40 किमी अंतरावर अत्यंत दुर्गम भागात माळीण गाव वसलं असल्यानं सकाळपर्यंत एवढ्या मोठ्या दुर्घटनेची साधी माहितीही कुणाला नव्हती. सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास पहिल्यांदा पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी काळानं कशी क्रूर झडप घातलीय, त्याचा अंदाज आला. त्यानंतर सरकारी यंत्रणा कामाला लागली. साडे अकराच्या सुमारास पिंपरी चिंचवडहून राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाच्या दोन तुकड्या दुर्घटनास्थळी रवाना झाल्या. दुपारी साडेबारापर्यंत जवळपास 30 अॅम्बुलन्स, पोकलँड, जेसीबी घटनास्थळी कसेबसे पोहोचले. डिंभे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दुर्गम भागात हे गाव वसलं होतं. मात्र मुसळधार पाऊस, त्यामुळं झालेला चिखल आणि गावापर्यंत जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्यानं मदतकार्यात अडथळे येत होते. आसपासच्या गावातले लोक मदतीसाठी धावून आले. त्यांच्या सहकार्यानं घोडेगाव पोलीस आणि आपत्ती निवारण टीमच्या जवानांनी बचावकार्याला सुरूवात केली. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांच्या सुटकेसाठी सध्या युद्धपातळीवर शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. 

माळीण गावातली 44 घरं त्यातल्या माणसांसह ढिगाऱ्याखाली गाडली गेल्याच्या वृत्तानं सर्वांचाच थरकाप उडाला. राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू असतानाच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना या दुर्घटनेची माहिती मिळाली. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अन्य मंत्र्यांसह ते दुर्घटनाग्रस्त गावाला भेट देण्यासाठी तत्काळ रवाना झाले. दुर्घटनाग्रस्तांच्या मदतीसाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

हिरव्यागार निसर्गाच्या कुशीत वसलेलं माळीण गाव... कायमचं काळाच्या उदरात गडप झालंय. आता उरलीय ती फक्त चिखलमाती... 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.