ममता बॅनर्जी यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री म्हणून ममता बॅनर्जींनी आज शपथ घेतील. सलग दुसऱ्यांदा ममता बॅनर्जी मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यात. 

PTI | Updated: May 27, 2016, 01:59 PM IST
ममता बॅनर्जी यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ   title=

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री म्हणून ममता बॅनर्जींनी आज शपथ घेतील. सलग दुसऱ्यांदा ममता बॅनर्जी मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यात. 

राजभवनाऐवजी खुल्या मैदानात हा शपथविधी सोहळा पार पडला. तृणमूल काँग्रेसच्या विधिमंडळ नेतेपदी निवड झाल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी सरकार स्थापनेचा दावा केला होता. त्यावेळी राज्यपालांनी ममता बॅनर्जी यांना सरकार स्थापनेचं निमंत्रण दिले होता.

ममतांचे यश

बंगालमध्ये तीच एकमेव बॅनरगर्ल होती, जिंकली तर यश तिचं आणि अपयश आलं तर त्याची धनीही तिच. तिच्या विरोधात सगळ्यांनी शस्त्र परजली होती. पण ममता बॅनर्जी सगळ्यांना पुरून उरल्या आणि त्यांनी करुन दाखवलं. 

कुणाच्याही घोळात न पडता, कुणाशीही युती न करता एकला चलो म्हणतच ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगालमध्ये विजय मिळवलाय. बंगालमध्ये ममता विरुद्ध सगळे असाच सामना होता. मुळातच सगळ्या विरोधकांची घोषणा तृणमूलमुक्त काँग्रेस असतानाही ममता टिच्चून उभ्या राहिल्या. 

डाव्यांना चपराक

अत्यंत साध्या राहणीच्या नेतृत्वानं अतिशय संयमानं मिळवलेला विजय, असं याचं वर्णन करावं लागेल. या यशाच्या लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेत्री सगळं काही ममता दीदीच होत्या. त्या जिंकल्या तर यश त्यांचंच होतं, आणि अपयश आलं तर त्याच्या धनीही त्याच होत्या.  ममता बॅनर्जींचा हा विजय ममतांचं कौतुक करणारा आहे. पण त्याहीपेक्षा जास्त डाव्यांचा नाकर्तेपणा अधोरेखित करणारा आहे. 

डावे - काँग्रेस सत्तेसाठी एकत्र

२०११ मधल्या पराभवानंतर डावे सावरलेलेच नाहीत. त्यामुळे त्यांची या निवडणुकीत आणखी घसरण झाली. पश्चिम बंगालमध्ये इतकी वर्षं एकमेकांविरोधात लढलेले डावे आणि काँग्रेस फक्त सत्तेसाठी एकत्र आले, हे बंगाली जनतेनं ओळखलं. परिणामी युती करुनही काँग्रेस-डाव्यांच्या पारड्यात काही पडलं नाही. 

भाजपचे यश बोटावर मोजण्याइतपत

याही निवडणुकीत परंपरेनुसार भाजपला पश्चिम बंगालमध्ये एका हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच मार्क मिळाले. पण तरीही भाजपनं ममतांना छुपी मदत केल्याचं बोललं जातं. राज्यात पक्षाची ताकद नाही, हे माहित असतानाही दोन तृतीयांश जागांवर उमेदवार उभे केले. त्यामागे मोदीभाई आणि ममता दीदींचं कनेक्शन असल्याचं बोललं जातं. राज्यसभेत मोदी सरकारला अनेक बिलं मंजूर करुन घ्यायची आहेत. त्यासाठी प्रादेशिक पक्षांची मदत लागणार आहे. म्हणूनच भाजपनं उमेदवार उभे करुन मतविभाजन केल्याचा आरोप डाव्यांनी केलाय.