ममता म्हणाल्यात, मी कोलकात्याला जातेय!

By Surendra Gangan | Last Updated: Wednesday, April 10, 2013 - 15:55

www.24taas.com, नवी दिल्ली
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या कमालीच्या संतप्त झाल्या आहेत. त्यांनी दिल्ली सोडण्याचा निर्णय घेतलाय. त्यांनी तसे स्पष्टही केलंय, मी कोलकात्याला जातेय!
मंगळवारी `स्टुडंट्‌स फेडरेशन ऑफ इंडिया`च्या (एसएफआय) कार्यकर्त्यांकडून धक्काबुक्की झाल्याने, आज बुधवारी ममता यांनी दिल्ली सुरक्षित नसल्यामुळे मी कोलकत्याला परतत असल्याचे सांगितले. त्यांची नियोजीत बैठक रद्द झाली. दुपारी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्यासोबत बैठक होणार होती.
ममता बॅनर्जी आणि राज्याचे अर्थमंत्री अमित मित्रा यांना मंगळवारी एसएफआयच्या संतापाचा सामना करावा लागला होता. नियोजन मंडळाच्या कार्यालयाबाहेर या दोघांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांनी केला होता. अमित मिश्रा हे सध्या एम्स रुग्णालयात दाखल आहेत. त्यामुळे आज तृणमुल काँग्रेसकडून आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, ममता बॅनर्जी यांनी कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन केले आहे.

एसएफआय ही मार्क्सावादी कम्युनिस्ट पक्षाची विद्यार्थी संघटना आहे. संघटनेचा कार्यकर्ता सुदीप्त घोष याच्या मृत्यूच्या निषेधार्थ ही निदर्शने करण्यात येत होती. ममता आणि अमित मित्रा नियोजन मंडळाजवळ येताच, सुमारे दीडशे कार्यकर्त्यांनी त्यांच्या दिशेने धाव घेत धक्काबुक्कीचा प्रयत्न केला.
या प्रकारामुळे संतापलेल्या ममतांनी नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष मॉन्टेकसिंग अहलुवालिया आणि नियोजन राज्यमंत्री राजीव शुक्ला यांच्यावरही शेरेबाजी केली. दिल्ली पोलिसांवरही त्यांनी आगपाखड केली. आंदोलकांनी आपल्यावर लोखंडी सळईने हल्ल्याचा प्रयत्न केला, असे ममतांचे म्हणणे आहे.

First Published: Wednesday, April 10, 2013 - 15:52
comments powered by Disqus