ममतांनी काढला केंद्र सरकारचा पाठिंबा

इंधन दरवाढ आणि एफडीआयच्या मुद्याबाबत केंद्र सरकारने सकारात्मक पाऊल न उचलल्यामुळे तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी आज केंद्र सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या शुक्रवारी तृणमूल काँग्रेसचे सर्व सहा मंत्री राजीनामे देणार असल्याचे ममता बॅनर्जी यांनी आज कोलकत्यात सांगितले.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Sep 18, 2012, 08:56 PM IST

www.24taas.com, कोलकता
इंधन दरवाढ आणि एफडीआयच्या मुद्याबाबत केंद्र सरकारने सकारात्मक पाऊल न उचलल्यामुळे तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी आज केंद्र सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या शुक्रवारी तृणमूल काँग्रेसचे सर्व सहा मंत्री राजीनामे देणार असल्याचे ममता बॅनर्जी यांनी आज कोलकत्यात सांगितले.

इंधन दरवाढ आणि एफडीआयच्या मुद्याबाबत तृणमूल काँग्रेसची आज कोलकात्या बैठक झाली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना ममता बॅनर्जी यांनी ही घोषणा केली.
केंद्रातील यूपीए सरकारवर विशेषतः काँग्रेसवर त्यांनी टीकेची झोड उठवली. काँग्रेसने कोणताही निर्णय घेताना आमच्याशी सल्लामसलत केली नाही. आमचा त्यांनी नेहमी अनादर केला. सरकारने नेहमी जनहिताविरोधात निर्णय घेतले. त्यामुळे आम्ही अशा सरकारमधून बाहेर पडत असल्याचे ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केले.
ममता बॅनर्जींनी डिझेल दरवाढ आणि एफडीआयच्या मुद्द्यावरून सरकारच्या नाकी नऊ आणले आहे. ही दरवाढ मागे घेण्याबाबत ममतांनी सरकारला ७२ तासांचा अल्टिमेटम दिला होता. मात्र ममतांच्या अल्टिमेटमला सरकारनं भीक घातलेली नाही.
या नंतर ममतांनी आज तृणमूल काँग्रेसची बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये अनेक खलबतं झाल्याचं सांगण्यात येत आहे.
मनमोहन सरकारमध्ये तृणमूल काँग्रेसचा एक कॅबिनेट मंत्री तर पाच राज्यमंत्री आहेत.
त्यातील काही नेत्यांचा सरकारचा पाठिंबा काढण्यास विरोध आहे. त्यामुळे बैठकीत ममतांचं मन वळवण्यात नेत्यांना यश येतं का याकडे देशाचं लक्ष लागलं आहे