`सोनियांच्या खर्चाचं पंतप्रधानांनी द्यावं उत्तर`

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या परदेश दौऱ्यावर झालेल्या खर्चावरून गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि काँग्रेसमध्ये शाब्दिक युद्ध रंगलंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Oct 2, 2012, 05:32 PM IST

www.24taas.com, अहमदाबाद
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या परदेश दौऱ्यावर झालेल्या खर्चावरून गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि काँग्रेसमध्ये शाब्दिक युद्ध रंगलंय. सोनिया गांधी यांनी गेल्या काही वर्षात केलेल्या परदेश दौऱ्यांवर १८८० कोटी रुपये खर्च केल्याचं वृत्त मला एका वर्तमानपत्रातून समजलंय. आता सोनिया गांधी यांनी स्वत: यावर उत्तर द्यावं.
नरेंद्र मोदींनी दोन दिवसांपूर्वी सोनिया गांधींनी १८८० रुपये खर्च केल्याचं जाहीर वक्तव्य केलं होतं. यावर काँग्रेसनं पक्षानं जोरदार टीका केली. मोदींची ही वक्तव्य बेजबाबदार आणि खोटी असल्याचं काँग्रेसनं म्हटलंय. त्यावर उत्तर देताना मोदींनी सोनियांच्या परदेश खर्चाची माहिती ही आपली नसून आपल्याला एका वर्तमानपत्रातून ती कळल्याचं म्हटलं होतं. या आरोपांमध्ये तथ्य नसल्यास माफी मागण्याचीही तयारी त्यांनी दर्शवलीय.
आज पुन्हा नरेंद्र मोदी यांनी एका जाहीर सभेत याबद्दल काँग्रेसवर पलटवार केलाय. ‘जुलै महिन्यात एका वर्तमानपत्रातून मला ही बातमी समजली होती. त्यानंतर अनेक वर्तमानपत्रांनी ही बातमी उचलून धरली होती. ही बातमी चुकीची होती तर काँग्रेस आणि सरकार अजून गप्प का बसलं? त्यांनी अजून या वर्तमानपत्रांना कायदेशीर नोटीस का पाठवल्या नाहीत. सोनिया यांच्या दोऱ्यावर सरकारी तिजोरीतून झालेल्या खर्चावर मनमोहन सिंह यांनी उत्तर द्यावं’ असं यावेळी नरेंद्र मोदींनी म्हटलंय. ‘या खर्चाचा हिशोब मागणं हा काही गुन्हा नव्हे... मी कुणाच्याही धमक्यांना घाबरत नाही. सरकारनं २००४-१२ पर्यंत झालेल्या सगळ्या दौऱ्यांची माहिती सार्वजनिक करावी’ असंही यावेळी मोदी यांनी म्हटलंय.