उत्तर प्रदेशात 'यादवी दंगल'... मुख्यमंत्र्यांची पक्षातून हकालपट्टी

उत्तरप्रदेशात समाजवादी पार्टीत उभी फूट पडलीय. शिस्तभंगाची कारवाई करत सपाचे अध्यक्ष मुलायम सिंह यांनी चक्क आपल्या मुलाची म्हणजेच मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचीच पक्षातून हकालपट्टी केलीय.  

Updated: Dec 30, 2016, 07:12 PM IST
उत्तर प्रदेशात 'यादवी दंगल'... मुख्यमंत्र्यांची पक्षातून हकालपट्टी title=

नवी दिल्ली : उत्तरप्रदेशात समाजवादी पार्टीत उभी फूट पडलीय. शिस्तभंगाची कारवाई करत सपाचे अध्यक्ष मुलायम सिंह यांनी चक्क आपल्या मुलाची म्हणजेच मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचीच पक्षातून हकालपट्टी केलीय. सोबतच, सपाचे राष्ट्रीय महासचिव आणि राज्यसभेचे खासदार रामगोपाल यादव यांनाही पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आलंय. 

विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी उमेदवारांची वेगळी यादी जाहीर केल्यानं नाराज झालेल्या मुलायम सिंह यांनी 'अखिलेश यादव पक्षात गटबाजी करत आहे' असा आरोप करत ही शिस्तभंगाची कारवाई केलीय. 

शुक्रवारी एका पत्रकार परिषदेत मुलायम सिंह यांनी मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि रामगोपाल यादव यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आल्याचं जाहीर केलंय... यामुळे उत्तरप्रदेशच्या राजकारणाला वेगळं वळण लागलंय. 

रामगोपाल यांना पक्षातील सर्व पदांवरून दूर करण्यात आलंय. रामगोपाल यांनी अनेकदा पक्षाचे नियम मोडले... सोबतच त्यांनी पक्षावरही नुकसान पोहचवलंय... त्यामुळे त्यांचं निलंबन करण्यात आल्याचं मुलायम सिंह यांनी म्हटलंय. 

मुख्यमंत्री कोण असेल? याचा निर्णय लवकरच

आम्ही समाजवादी पार्टीला तुटू देणार नाही... मी पुढचा मुख्यमंत्री कोण असेल याचा निर्णय घेईल. पक्षाला वाचवण्यासाठी आम्ही अखिलेश आणि रामगोपाल यादव यांना हटवण्याचा निर्णय घेतलाय. रामगोपालनं बोलावलेल्या सम्मेलनात जो कुणी सहभागी होईल त्याचीही पक्षातून हकालपट्टी करण्यात येईल, असंही मुलायम सिंग यांनी जाहीर केलंय.