आम आदमीला विसरलेला अर्थसंकल्प- मुंडे

आज लोकसभेत अर्थमंत्री चिदंबरंम यांनी सादर केलेला अर्थसंकल्प म्हणजे महागाईला जन्म देणारा, आम आदमीला विसरलेला आणि शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणारा हा अर्थसंकल्प असून यामुळे सर्व सामान्यांना आणखी महागाईला सामोरे जावे लागेल, अशी प्रतिक्रिया भाजपाचे लोकसभेतील उपनेते खा. गोपीनाथ मुंडे यांनी व्यक्त केली आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Feb 28, 2013, 08:29 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
आज लोकसभेत अर्थमंत्री चिदंबरंम यांनी सादर केलेला अर्थसंकल्प म्हणजे महागाईला जन्म देणारा, आम आदमीला विसरलेला आणि शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणारा हा अर्थसंकल्प असून यामुळे सर्व सामान्यांना आणखी महागाईला सामोरे जावे लागेल, अशी प्रतिक्रिया भाजपाचे लोकसभेतील उपनेते खा. गोपीनाथ मुंडे यांनी व्यक्त केली आहे.

हे सरकार आम आदमीचे नाव घेऊन सत्तेवर आले, पंतप्रधान आणि सोनिया गांधी या नेहमी आम आदमीचे नाव घेतात, पण आज सादर केलेल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यानी आम आदमीचे उल्लेखपण केला नाही. हे सरकार आम आदमीला पूर्णपणे विसरलेले असून सादर करण्यात आलेल्या १७ हज़ार कोटी रूपयांच्या करवाढीमुळे चलनवाढ होईल आणि त्याचा परिणाम महागाई मोठ्याप्रमाणात वाढण्यात होणार आहे.

देशातील ७० टक्के लोक शेतीवर अवलंबून असतानाही शेतकऱ्यासाठी कोणतीही नवी योजना नाही. ठोस धोरण नाही. दुष्काळात होरपळणाऱ्या देशातील शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला नाही, सर्वांची निराशा करणारा हा अर्थसंकल्प असल्याचे मुंडे यांनी म्हटले आहे.