Assembly Election Results 2017

मोदी-अडवाणी संघर्षाचं मूळ : पाकिस्तान दौरा

भाजपमध्ये सध्या नरेंद्र मोदी विरुद्ध लालकृष्ण अडवाणी असा थेट संघर्ष पहायला मिळतोय. पण, या संघर्षाचं मूळं २००५ मधील अडवाणींच्या पाकिस्तान दौऱ्यात दडलीत.

शुभांगी पालवे | Updated: Sep 13, 2013, 02:01 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
भाजपमध्ये सध्या नरेंद्र मोदी विरुद्ध लालकृष्ण अडवाणी असा थेट संघर्ष पहायला मिळतोय. पण, या संघर्षाचं मूळं २००५ मधील अडवाणींच्या पाकिस्तान दौऱ्यात दडलीत. तेव्हापासून सुरु झालेला या दोन नेत्यांमधील संघर्ष आता टोकाला पोहोचलाय. मोदींच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीला अडवाणींनी केलेला विरोध हा त्या संघर्षाचाच परिपाक आहे.
पुढच्या वर्षी दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून पंतप्रधान या नात्याने राष्ट्राला उद्देशून भाषण करण्याचे स्वप्न नरेंद्र मोदी पाहतायत. ते स्वप्न वास्तवात उतरेल की नाही, हे काळच ठरवले. पण सध्याच्या घडीला भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी मोदींच्या स्वप्नाला सुरूंग लावलाय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आणि भाजपचे नेते मनधरणी करत असूनही पंतप्रधानपदासाठी मोदींच्या उमेदवारीला पाठिंबा द्यायला अडवाणी तयार नाहीत.
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे आगामी लोकसभा निवडणुकीच्या भाजपच्या प्रचाराची धुरा सोपवण्यात आली त्यावेळीही अडवाणींनी नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी भाजपच्या सर्व पदांचा राजीनामा दिली होता. अडवाणी यांनी भाजपच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण केल्यानं त्यावेळी अडवाणी विरुद्ध मोदी असा संघर्ष निर्माण झाला होता.
पण, अडवाणी विरूद्ध मोदी हा संघर्ष काही आजकालचा नाही. २००५ मध्ये पाकिस्तानमध्ये जाऊन अडवाणी यांनी जेव्हा मोहम्मद अली जिन्ना यांची स्तुती केली आणि आरएसएसचा रोष ओढवून घेतला होता. त्यावेळी मोदींनीही आरएसएसच्या सुरात सूर मिळवला होता. त्यावेळी अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.
नरेंद्र मोदींच्या अडचणीच्या काळात अडवाणी धावून गेले होते. गुजरातमध्ये पक्ष संघटक म्हणून जबाबदारी सांभाळत असताना मोदींनी आपल्या पक्षातील शंकरसिंह वाघेला यांना शह देण्याचा प्रयत्न केला. पुढे केशूभाई पटेल मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी केशूभाईंसाठी अडचणी निर्माण केल्या. पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाकडं मोदींविरोधात तक्रारी वाढल्या. त्यावेळी मोदींना दिल्लीला बोलावून घेण्यात आलं. पुढे अडवाणींच्याच मदतीने मोदी पुन्हा गुजरातमध्ये जावून पोहोचले आणि २००१ मध्ये थेट गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. त्यानंतर निवडणूका झाल्या, मात्र त्याला दंगलीची पार्श्वभूमी होती. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींनीही मोदींना खडे बोल सुनावले होते. तेव्हाही अडवाणी मोदींच्या मदतीला धावून गेले. त्यांनी संसदेत उभे राहून मोदींची पाठराखण केली. पण राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही. अडवाणी आणि मोदींच्या बाबतीत तेच झालंय.

जिन्नांच्या स्तुतीवरुन या दोन्ही नेत्यांमध्ये मतभेद झाले. पुढे ते वाढतच गेले... दोन वर्षापूर्वी मोदींनी आपली सेक्युलर इमेज तयार करण्यासाठी सदभावना मिशन सुरु केलं. अडवाणींनी भ्रष्टाचारविरोधी यात्रा काढून त्याला काटशह देण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे त्यांनी या भ्रष्टाचारविरोधी यात्रेची सुरुवात गुजरातच्या पोरबंदरऐवजी मोदींचे कट्टर विरोधक नितीश कुमार यांच्या बिहारमधून केला... भाजपच्या या दोन नेत्यांमधील सुप्तसंघर्षाचं पक्षाकडून खंडन केलं गेलं. पण २०१४च्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाने मोदींकडं नेतृत्व सोपवण्याचं ठरवल्यानं हा संघर्ष पुन्हा उफाळून आलाय.
भाजपच्या नेतृत्वातील हे खांदेपालट पक्षाला ढवळून काढत असून, या मंथनातून विष बाहेर येणार की अमृत, हे येणारा भविष्यकाळच ठरवणार आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.