मोदींना हवीय पंतप्रधान दर्जाची सुरक्षा, काँग्रेसला राजीव गांधींची आठवण

मोदींना पंतप्रधान दर्जाची सुरक्षा देण्याची मागणी भाजप संसदीय बोर्डानं केलीय तर मोदींसाठी सध्याची झेड-प्लस सुरक्षा पुरेशी असल्याचं सांगत काँग्रेस सरकारनं ही मागणी फेटाळून लावलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Nov 6, 2013, 05:34 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
मोदींना पंतप्रधान दर्जाची सुरक्षा देण्याची मागणी भाजप संसदीय बोर्डानं केलीय तर मोदींसाठी सध्याची झेड-प्लस सुरक्षा पुरेशी असल्याचं सांगत काँग्रेस सरकारनं ही मागणी फेटाळून लावलीय.
नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानांच्या दर्जाची सुरक्षा दिली जावी, अशी मागणी भाजपच्या संसदीय बोर्डानं केलीये. मोदींना सध्या २४ तास ‘एनएसजी कमांडों’ची झेड प्लस सुरक्षा आहे. ती वाढवून पंतप्रधान दर्जाच्या ‘स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप’ची सुरक्षा पुरवावी, अशा मागणीचा ठराव बोर्डाच्या आज झालेल्या बैठकीत करण्यात आला. मोदींच्या पाटण्यातल्या सभेवेळी झालेल्या साखळी स्फोटांनंतर त्यांची सुरक्षा वाढवण्याची मागणी भाजपकडून केली जातेय. निवडणुका जवळ आल्यात, अशा वेळी भाजपकडून अनेक प्रचार रॅली आयोजित करण्यात येतील, त्यामुळे नरेंद्र मोदींना सुरक्षा पुरविण्याची संपूर्ण जबाबदारी ही केंद्र सरकारची असल्याचं भाजपचे प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनी एका पत्रकार परिषदेत म्हटलंय.

सरकारनं मात्र ही मागणी फेटाळून लावलीय. मोदींना पुरेशी सुरक्षा देण्यात आली असून ‘स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप’ दर्जाच्या सुरक्षेची गरज नसल्याचं केंद्रीय गृहराज्यमंत्री आरपीएन सिंह यांनी म्हटलंय. ‘राजीव गांधी यांना एऩडीएकडून पुरवण्यात आलेल्या सिक्युरिटीची आठवण करून द्यावीशी वाटतेय... त्यांनी राजीव गांधी यांनी सब-इन्स्पेक्टर लेव्हलचीही सुरक्षा पुरविली नव्हती आणि त्यामुळे त्यांना आपला जीव गमवावा लागला. पण, मी भाजपला आश्वासन देऊ इच्छितो की आम्ही नरेंद्र मोदी यांनी योग्य सुरक्षा देतोय’, असं सिंह यांनी यावेळी म्हटलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.