हिंसेसाठी तयार राहा; हाफीजची भारताला चिथावणी

‘जम्मू आणि काश्मीर भागात आणखी हिंसेसाठी तयार राहा’ असा धमकीवजा संदेश हाफीजनं नवी दिल्लीला धाडलाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jan 11, 2013, 11:55 PM IST

www.24taas.com, इस्लामाबाद
नियंत्रण रेषेवर दोन भारतीय जवानांची अत्यंत क्रूर पद्धतीनं हत्या करण्यात आल्यानंतर भारत-पाकिस्तान दरम्यानच्या तणावात भरच पडलीय. आता, लष्कर-ए-तोयबाचा संस्थापक हाफीज सईदनं भारताला धमकीचा संदेश पाठवून त्यात आणखी भर घातलीय. ‘जम्मू आणि काश्मीर भागात आणखी हिंसेसाठी तयार राहा’ असा धमकीवजा संदेश हाफीजनं नवी दिल्लीला धाडलाय.
मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सुत्रधार हाफीज सईद यानं वृत्त एजन्सी ‘रायटर्स’शी बोलताना ही धमकी दिलीय. ‘हिंसेसाठी आम्हाला कोणत्याही प्रकारची शक्ती किंवा सैन्य अभियानाचा वापर करायचा नाही. पण, भारत इतर पर्यायांवर नक्कीच विचार करत आहे’ असं हाफीजनं म्हटलंय. सईदनं भारतावर पाकिस्तानला अस्थिर केल्याचाही आरोप केलाय.

शस्त्रसंधीचं उल्लंघन करत पाकिस्ताननं दोन भारतीय जवानांची अत्यंत क्रूर पद्धतीनं हत्या केलीय. त्यामध्ये लान्स नायक सुधाकर सिंह आणि लान्स नायक हेमराज सिंह या दोघांना आपला जीव गमवावा लागला. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार यांनी, या घटनेमागे हाफीज सईदचा हात असल्याची शक्यता असल्याचं गुरुवारी म्हटलं होतं. या घटनेच्या काही दिवस अगोदर हाफीज सईदनं पाक हद्दीतील काश्मीर प्रांताचा दौरा केला होता.