आता इंटरनेटही झालं महाग!

डेटाकार्डच्या साहाय्यानं मिळणारी इंटरनेट सुविधा आता थोडी महाग होण्याची शक्यता आहे.

www.24taas.com, नवी दिल्ली
डेटाकार्डच्या साहाय्यानं मिळणारी इंटरनेट सुविधा आता थोडी महाग होण्याची शक्यता आहे. डेटा सेवेसाठी ग्राहकांना ३० टक्के अधिक बिल भरावं लागण्याची शक्यता आहे. कारण, प्रमुख दूरसंचार कंपन्यांपैकी भारती एअरटेल आणि व्होडाफोन यांनी आपल्या डेटा सेवेत दरवाढ करण्याचा निर्णय घेतलाय.
इतर कंपन्याही लवकरच व्होडाफोन आणि भारती एअरटेल या कंपन्यांच्या पावलावर पाऊल ठेवण्याची शक्यता आहे. भारती एअरटेलनं नुकतंच आपल्या २जी डेटासेवा दरांत वाढ जाहीर केलीय. एक जीबी २जी डेटा योजनेचा दर १०० रुपयांवरून १२५ रुपये करण्यात आलाय. इतर प्रतिस्पर्धी कंपन्याही मार्जिन सुधारण्यासाठी आपल्या दरांत वाढ करण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

एअरटेलच्या प्रवक्त्यांच्या म्हणण्यानुसार, नुकतंच दरांत फक्त २७३ पैसे प्रति एमबीची वाढ करण्यात आलीय. व्होडाफोननंही आपल्या मासिक डेटा योजनेमध्ये दरवाढ केलीय. कंपनीनं वेगवेगळ्या प्रीपेड योजनेमधील डेटासीमा कमी करण्यात आलीय. व्होडाफोनचा २८ दिवसांसाठी वैध असणारा ९५ रुपयांच्या प्लानसाठी आता १२४ रुपये मोजावे लागणार आहेत. तर २५० एमबी डेटा तसंच १५० एमबी डेटा प्लानची डेटा कमी करून क्रमश: १५० एमबी तसंच १०० एमबी करण्यात आलाय.
आयडिया सेल्युलरच्या प्रवक्त्यांनी मात्र याबद्दल अजून काही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण सूत्रांच्या माहितीनुसार कंपनाच्या डेटा शुल्कात बदल होण्याची दाट शक्यता आहे. प्रतिस्पर्धी कंपन्यांच्या दबावामुळे कंपन्या दर वाढ करण्यास अजून धजत नाहीत, असं उद्योगजगातील सूत्रांचं म्हणणं आहे.