मुख्यमंत्र्यांनी फेसबुकचे लाइक्स विकत घेतलेः भाजप

सोशल मीडियामध्ये सर्वाधिक लोकप्रिय राजकीय व्यक्तींमध्ये गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री शशी थरूर यांच्या स्पर्धेत राजस्थानचे अशोक गेहलोत उतरले आहेत. मात्र, गेहलोत यांची फेसबुकवरील लोकप्रियता बनावट असल्याचा दावा त्यांच्या विरोधकांनी केला आहे.

प्रशांत जाधव | Updated: Jul 10, 2013, 06:14 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, जयपूर
सोशल मीडियामध्ये सर्वाधिक लोकप्रिय राजकीय व्यक्तींमध्ये गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री शशी थरूर यांच्या स्पर्धेत राजस्थानचे अशोक गेहलोत उतरले आहेत. मात्र, गेहलोत यांची फेसबुकवरील लोकप्रियता बनावट असल्याचा दावा त्यांच्या विरोधकांनी केला आहे.
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी फेसबुकवर आपण किती लोकप्रिय आहोत हे दाखवण्यासाठी लाइक्स विकत घेतल्याचा आरोप भाजपने केला आहे. यामुळे राजस्थानमध्ये सध्या सोशल नेटवर्किंग घोटाळा हा चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे.
सोशल नेटवर्किंग साइट्सवर अस्तित्व ठळकपणे दिसण्यासाठी भाजप विशेष प्रयत्न करत असल्याने काँग्रेसनेही काळाची पावले ओळखत सोशल नेटवर्किंग साइट्सना जवळ करण्याचा सल्ला नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना दिला. यामुळे उत्साहाच्या भरात गेहलोत यांनी फेसबुक अकाउंट सांभाळण्यासाठी खास एजन्सी नेमली. मात्र, गेहलोत यांची लोकप्रियता वाढवून दाखवण्यासाठी या एजन्सीच्या माध्यमातून लाइक्स विकत घेण्याचा आरोप भाजपने केला आहे. प्रथमदर्शनी या आरोपात तथ्य असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
नेत्यांची लोकप्रियता त्यांच्या ट्विटर, फेसबुक या सोशल नेटवर्किंग साईटवरील फॉलोअर्सची संख्या आणि पेजला मिळालेल्या लाईकद्वारे ठरवली जात आहे. तसेच लोकप्रियता मिळवण्यासाठी नेत्यांनीही आता सोशल नेटवर्किंग साईटचा आधार घेत विरोधकांवर आरोप करण्यास सुरुवात केली. गेहलोत यांच्या प्रकरणामध्ये त्यांना टर्कीची राजधानी इस्तंबूलमधून प्रचंड प्रमाणावर लाइक मिळाल्याचे भाजपने म्हटले आहे.
ज्या देशात राजस्थानी लोकांची संख्या फारशी नाही त्या देशामध्ये गेहलोत अचानक लोकप्रिय होतात, हे काय गौडबंगाल आहे असा प्रश्न उपस्थित केला. तसेच, गेहलोत यांनी एजन्सीच्या माध्यमातून पैसा खर्च करून कृत्रिमरीत्या लाइक्स वाढवल्याचा आरोप केला. सदर एजन्सीचे काम इस्तंबूलमधून होत असावे, ज्यामुळे त्या शहरातून लाइक्सचे प्रमाण वाढले असावे असा संशयही व्यक्त करण्यात येत आहे.
ही संधी साधत भाजपच्या प्रवक्त्या किरण ज्योती यांनी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यावर निशाणा साधला आहे. किरण यांच्या दाव्यानुसार १ जून रोजी गहलोत यांचे फेसबुक पेज लाइक करणा-यांची संख्या १ लाख ६९ हजार ०७७ होती. ३० जूनला हाच आकडा सव्वा दोन लाखांच्या घरात पोहोचला. फेसबुक पेजवर मोस्ट पॉप्यूलर सिटी असा एक पर्याय आहे. यात तुमच्या पेजला सर्वाधिक लाईक कोणत्या शहरातून मिळाले आहेत ते कळते. गहलोत यांच्या फेसबुक पेजवर १ जून रोजी मोस्ट पॉप्यूलर सिटीमध्ये जयपूरचा समावेश होता. मात्र ३० जून रोजी हीच जागा इस्तंबूलने घेतली. त्यामुळे राजस्थान सोडून गहलोत यांना इस्तंबूलमधून कसे लाईक्स मिळू शकतात असा सवाल भाजपने उपस्थित केला आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.