रझा मुराद 'सी ग्रेड' अॅक्टर : उमा भारती

ज्येष्ठ सिने अभिनेते रझा मुराद यांनी नरेंद्र मोदींवर केलेली टीका भाजपला चांगलीच झोंबलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Aug 9, 2013, 08:34 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नागपूर
ज्येष्ठ सिने अभिनेते रझा मुराद यांनी नरेंद्र मोदींवर केलेली टीका भाजपला चांगलीच झोंबलीय. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या उपस्थितीत मुराद यांनी केलेल्या टीकेवर भाजप नेत्या उमा भारती यांनी नाराजी व्यक्त केलीय. यावेळी त्यांनी रझा मुराद यांना ‘सी ग्रेड अॅक्टर’ म्हणून हिणवलं.
‘एक सी ग्रेड अॅक्टर मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्या शेजारी उभा राहून गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची टर उडवतो... मला आश्चर्य वाटतंय हे झालंच कसं?... हा ईदचा दिवस आहे, कुणीही कुणासोबतही उभं राहण्याची संधी घेऊ शकतो. पण, आमच्याच पक्षाच्या एका मुख्यमंत्र्यांच्या बाजूला उभं राहून या सी ग्रेड अॅक्टरनं खालच्या दर्जाचं राजकारण केलं आणि नरेंद्र मोदींची टर उडवली. ही गोष्टी मला अजिबात रुचली नाही’ अशा शब्दांत उमा भारती यांनी आपला राग व्यक्त केला. पक्षाच्या व्यासपीठावर हा मुद्दा उपस्थित करणार असल्याचं उमा भारतींनी म्हटलंय. त्या नागपुरात बोलत होत्या.

रझा मुराद यांनी घेतली मोदींची फिरकी
मुस्लिमांची टोपी घातल्याने कोणत्याही धर्मावर संकट येत नसल्याची मनमुराद फिरकी अभिनेते रझा मुराद यांनी शुक्रवारी गुजरातचे मुख्यमंत्री नरेद्र मोदी यांचे नाव न घेता घेतली.
ईदनिमित्त आयोजित एका कार्यक्रमात मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि अभिनेते रझा मुराद एका मंचावर उपस्थित होते. यावेळी शिवराजसिंह चौहान यांनी मुस्लिमांची टोपी घातली होती. त्यावर प्रसार माध्यमांनी रझा मुराद यांची प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले, या ठिकाणी मी राजकीय प्रकरणावर भाष्य करणार नाही. पण काही असे मुख्यमंत्री आहे की ते मुस्लिमांची टोपी घातल नाही. मुस्लिमांची टोपी घातल्याने कोणाचा धर्मभ्रष्ट होत नाही. शिवराजसिंह चौहान यांच्याकडून काही मुख्यमंत्र्यांनी शिकावे, असाही टोला त्यांनी मोदींना लगावला आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.