रेपो रेटमध्ये वाढ, गृहकर्ज महागणार

भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज आपलं पतधोरण जाहीर केरत रेपो रेटमध्ये पाव टक्क्यांनी वाढ केलीय. महागाईचे चटके सोसणाऱ्या जनतेला रिझर्व्ह बँकेनं हा एक प्रकारचा झटकाच दिलाय. आरबीआयनं रेपो आणि रिव्हर्स रेपो रेटमध्ये पाव टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यामुळं गृहकर्ज महागण्याची शक्यता आहे.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Jan 28, 2014, 01:07 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज आपलं पतधोरण जाहीर केरत रेपो रेटमध्ये पाव टक्क्यांनी वाढ केलीय. महागाईचे चटके सोसणाऱ्या जनतेला रिझर्व्ह बँकेनं हा एक प्रकारचा झटकाच दिलाय. आरबीआयनं रेपो आणि रिव्हर्स रेपो रेटमध्ये पाव टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यामुळं गृहकर्ज महागण्याची शक्यता आहे.
या वाढीनंतर आता रेपो रेट ८ टक्के इतका झालाय, तर रिव्हर्स रेपो रेट ६.७५ वरून ७ टक्क्यांवर पोहोचला आहे. सीआरआरमध्ये मात्र रिझर्व्ह बँकेनं कोणताही बदल केलेला नाही. यामुळं सीआरआर ४ टक्केच राहणार असल्याचं स्पष्ट झालंय.
रिझर्व्ह बॅंकेच्या या निर्णयाचा फटका गृहकर्जांना बसण्याची दाट शक्‍यता असल्याचं सूत्रांनी सांगितलं. रेपो रेटमध्ये आणखी वाढ केली जाणार नाही, असा अंदाज सूत्रांनी वर्तविला होता. मात्र, या अंदाजाविरोधात रेपो रेटमध्ये वाढ करण्यात आल्यानं आश्‍चर्य व्यक्त करण्यात आले आहे.
दरम्यान, महागाई रोखण्यासाठी रेपो रेटमध्ये वाढ केल्याचं, गव्हर्नर रघुराम राजन यांनी सांगितलं. याशिवाय भविष्यात रेपो रेट कमी होण्याची शक्यता कमीच असल्याचे संकेतही राजन यांनी दिलेत. त्याचबरोबर रेपो रेटमध्ये आता यापुढं शक्‍यतो वाढ केली जाणार नाही, असे संकेतही रिझर्व्ह बँकेनं यावेळी दिले.
रेपो रेट म्हणजे काय?
रेपो रेट म्हणजे ज्या दरानं बँका रिझर्व बँकेकडून पैसे घेते तो दर. रेपो रेट वाढणं म्हणजे बँकांना रिझर्व बँकेकडून मिळणाऱ्या कर्जदरात वाढ होणं. साहजिकच ग्राहकांना बँकांकडून महागात कर्ज मिळणार...
रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय?
रिव्हर्स रेपो रेट म्हणजे रेपो रेटच्या अगदी उलट आहे. यात रिझर्व बँक वेगवेगळ्या बँकाकडून कर्जरूपानं पैसे घेत असते. तेव्हा त्यासाठी जो दर आकारला जातो, त्याला रिव्हर्स रेपो रेट म्हणतात.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.