सचिन, रेखानं पहिल्या दिवशी काय केलं?

Last Updated: Thursday, August 9, 2012 - 16:35

www.24taas.com, नवी दिल्ली
संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे.  राज्यसभेसाठी निवड झालेले सदस्य सचिन तेंडुलकर आणि  अभिनेत्री रेखा गणेशन यांनी पहिल्या दिवशी काय केले, असा प्रश्न पडला असेल ना? सचिन आणि रेखाने गोंधळ पाहीला. असे असले तरी या गदारोळात या दोघांचा प्रभाव दिवसभर राहिला. सचिन आणि रेखाला भेटण्यासाठी उपस्थित सर्व खासदार भेटण्यासाठी आतूर झाले होते.
आसाममधील वांशिक हिंसाचार आणि अमेरिकेत गुरुद्वारावरील गोळीबारासह विविध मुद्द्यांनी लोकसभेचा आणि राज्यसभेचा पहिला दिवस गाजला.  त्यात भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी सनसणीत आरोप केल्याने चांगलाच भडका उडाला. शांत दिसणाऱ्या सोनिया गांधी एकदम अंगावरच आल्या. त्यांचा आवेग पाहून अडवाणी यांनी आपले विधान मागे घेतले. त्यामुळे दिवसभर गदारोळ सुरूच होता. हा गोंधळ राज्यसभेतही होता, गोंधळ कसा घातला जातो हे सचिन आणि रेखाने डोळ्यांनी पाहिला.
सचिनची गाडी सकाळी दहा वाजून पन्नास मिनिटांनी आली, तेव्हा कॅमेरामनच्या गराड्याने गाडीचे दारही उघडता येईना, अशी स्थिती झाली. रेखाला तर संसदेत येणे व जाणेही कठीण झाले, इतकी गर्दी उसळली. संसदेत सपत्नीक आलेला सचिन, राज्यसभेच्या कामकाजात प्रथमच सहभागी झाला. त्याने सभागृहात पाऊल ठेवताच सर्वपक्षीय खासदारांची त्याच्याशी हस्तांदोलन करण्यासाठी चढाओढ सुरू झाली.
खासदारांच्या गर्दीतून वाट काढत सचिन हसतमुखाने आपल्या जागेवर येऊन बसला. त्यावर सी. रंगराजन यांनी त्याला प्रश्‍नोत्तरांची पुस्तिका व कामकाज पुस्तिका यांची माहिती दिली. त्यानंतर विजय मल्ल्या यांनी सचिनशेजारी जागा बळकावली ते अखेरपर्यंत तेथेच होते. पिवळ्या साडीतील रेखाला, तर कामकाज संपल्यावर महिला मंत्री व खासदारांनी गराडा घातला. रेणुका चौधरी यांनी येता क्षणी रेखाला मिठीच मारली.

First Published: Thursday, August 9, 2012 - 12:44
comments powered by Disqus