सोनिया आणि राजीव गांधींची प्रेम कहाणी

व्हॅलेंटाईन डेची तरूणांमध्ये मोठी चर्चा असते, अशा वातावरणात राजकीय नेत्यांची प्रेम कहाणी असेल, तर युवकांना ती स्टोरी जाणून घेण्यात नक्कीच रस असतो. 

Updated: Jan 13, 2016, 07:33 PM IST
सोनिया आणि राजीव गांधींची प्रेम कहाणी title=

मुंबई : व्हॅलेंटाईन डेची तरूणांमध्ये मोठी चर्चा असते, अशा वातावरणात राजकीय नेत्यांची प्रेम कहाणी असेल, तर युवकांना ती स्टोरी जाणून घेण्यात नक्कीच रस असतो. 

द रेड सारी : अ ड्रामॅटाइज्ड बायोग्राफी ऑफ सोनिया गांधी, हे पुस्तक, जेविएर मोरो या मूळ स्पॅनिश लेखकाने लिहिले आहे. या पुस्तकाचे इंग्रजी आवृत्तीचे प्रकाशन रोली बुक्सने केले आहे, हे पुस्तक आले तेव्हा त्याच्यावर खमंग आणि वादग्रस्त देखील चर्चा झाली.

लेखक मोरो यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलेले राजीव सोनिया यांच्या प्रेमाविषयीचे काही संदर्भ खाली देत आहोत, ही कहाणी काहींना रंजक वाटली, मात्र सोनिया विरोधकांना ती मनोमन पटली नसल्याचीही चर्चा देखील हे पुस्तक आलं तेव्हा होती.

सोनिया आणि राजीव गांधींची प्रेम कहाणी
सोनिया ही साधी मुलगी होती, तिचे वडील स्टेफानो मायनो हे कष्टाळू आणि साधे होते, ते मुलींना धाकात ठेवत आणि मुलींचं शिक्षण उत्तमच व्हावं असं त्यांना वाटे म्हणून सोनिया ब्रिटनमध्ये केम्ब्रिजच्या लेनॉ कूक लँग्वेज स्कूलमध्ये दाखल होऊ शकली (प्रकरण ३).

एरवी कुणाही मुलासोबत न फिरणारी सोनिया राजीव गांधी यांच्याकडे आकृष्ट झाली, तेव्हा तिने प्रेमाचा विचार झटकून टाकण्याचा अयशस्वी प्रयत्न केला (प्र. ४).

राजीवही किती साधा, लाजाळूच होता आणि एकमेकांच्या व्यक्तिमत्त्वांतील साधेपणाच आवडू लागलेल्या या दोघांनाही, प्रेमात पडणे म्हणजेच जीवनसाथी होणे असे वाटत होते (प्रकरण ४-५).

सोनियाच्या कुटुंबाने हा मुलगा परधर्मीय, परंतु ‘चांगल्या घरचा’ असल्याने त्यांच्या प्रेमाला- पर्यायाने लग्नालाच- अनुमती दिली, तरीही सोनियाला राजीवपासून सुरक्षित अंतर राखावेसे वाटत होते (प्रकरण ५).

या सर्व काळात राजीव वैमानिक होण्यासाठी मेहनत घेत होता, अखेर राजीवच्या आईनेही लंडन-भेटीदरम्यान सोनियाला पसंती दिली, तेव्हा सोनियाला ‘जणू आईच भेटली’ असे वाटले (प्रकरण ६).

सोनियाने भारतात यावे व एकटीने अन्य जागी राहून देश पाहावा या राजीवच्या विनंतीवर ‘२१ वर्षांची होईस्तो मी माझ्या मुलीला कुठेही नाही पाठवणार’ असे उत्तर स्टेफानो यांनी दिले (प्रकरण ७).

ती लाल साडी
सासूबाई इंदिरा यांनी सोनियाची राहण्याची व्यवस्था हरिवंशराय आणि तेजी बच्चन यांच्या घरी केली, त्या घराचं वर्णन ‘अमिताभचं घर’ असं लेखक मोरो करतात. ‘लाल साडी’ अर्थातच, लग्नासाठी इंदिरा यांनी सुनेसाठी घेतली होती आणि ती फिकट लाल रंगाची होती. 

हे साल होतं १९६८. म्हणजे राजीव-सोनियाच्या ओळखीला तीन र्वष झाली होती. लग्नसोहळा निधर्मीच पद्धतीनं व्हावा, असा इंदिरा यांचा आग्रह होता, हे सांगताना लेखक ‘नेहरूंनी मात्र इंदिरा यांना सात फेरे घेण्यास भाग पाडलं’ देखील उल्लेख पुस्तकात आहे.