'मोदींनी टॉयलेट साफ करण्याचा आनंद उपभोगलाय का?'

‘आधी शौचालय, मग देवालय’ असं म्हणणाऱ्या भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी चांगलीच गुगली टाकलीय.

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
‘आधी शौचालय, मग देवालय’ असं म्हणणाऱ्या भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी चांगलीच गुगली टाकलीय.
‘जे लोक स्वत:च टॉयलेट साफ करतात त्यांना एका पद्धतीनं वेगळाच आनंदाची अनुभूती येते... असं मोदींनी म्हटलेलं मी वर्तमानपत्रात वाचलंय. पण, हाच आनंद त्यांनी कधी उपभोगलाय का?’ असं म्हणत दिग्गीराजांनी मोदींवर गुगली टाकलीय.
‘पण, मोदींचं हे वक्तव्य इतर वक्तव्यांपेक्षा वेगळं नाही. ते त्यांची भूमिका दर १५ दिवसांनी बदलत असतात आणि आता हे काय नवीन राहिलेलं नाही. भाजपनं आणि विश्व हिंदू परिषदेनं मोदींच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया द्यायलाच हवी’ असंही दिग्विजय सिंग यांनी म्हटलंय.
जाहीर आहे दिग्गीराजांनी नेहमीप्रमाणेच मोदींवर टीका करण्याची हीदेखील संधी सहजासहजी सोडणार नाही. मात्र, दिग्विजय यांच्या या वक्तव्यानंतर आता पुन्हा लोकांचं लक्ष लागलंय ते नरेंद्र मोदींच्या उत्तराकडे...
नरेंद्र मोदी यांनी बुधवारी बोलताना, `पहले शौचालय, फिर देवालय` असं सांगत राम मंदिरापेक्षा विकासाला आपलं प्राधान्य असल्याचं सूचित केलं होतं. युवकांना ध्यानात ठेऊन मोदींनी एका कार्यक्रमात हे वक्तव्य केलं होतं. आपण हिंदुत्ववादी नेते असल्याची आपली इमेज असली तर हे बोलण्याचं आपण धाडस करू शकतो, अशीही पुष्टी मोदींनी जोडली होती.
‘मला हिंदुत्ववादी नेता म्हणून ओळखलं जातं. माझी इमेज मला असं बोलण्याची परवानगी देणार नाही, पण असं म्हणायची माझ्यात हिंमत आहे. खरोखरच, आधी शौचालय आणि मग देवालय, असंच माझंही म्हणणं आहे’.

उल्लेखनीय गोष्ट म्हणजे, केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री जयराम रमेश यांनीही शौचालयांवर काहीसा असंच मत व्यक्त केलं होतं. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे देशात मंदिरांपेक्षा शौचालयांची जास्त गरज आहे. पण, त्यांनी हे वक्तव्य केल्यानंतर मात्र इतरांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली होती. अनेक महिला संघटना आणि एनजीओनं त्यांच्या या वक्तव्याविरोधात जोरदार आंदोलनही केलं होतं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.