`नाक दाबून सुनंदा पुष्कर यांच्या तोंडात विष ओतलं`

केंद्रीय मंत्री शशी थरूर यांची पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या हत्या प्रकरणाला आता वेगळं वळण मिळालंय. भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी सुनंदा यांचा मृत्यू ही `हत्या` होती असं म्हटलंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Feb 24, 2014, 12:55 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
केंद्रीय मंत्री शशी थरूर यांची पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या हत्या प्रकरणाला आता वेगळं वळण मिळालंय. भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी सुनंदा यांचा मृत्यू ही `हत्या` होती असं म्हटलंय.
थरुर यांची पत्नी सुनंदा हिची हत्या झाली होती, असं स्वामी यांनी म्हटलंय. `सुनंदा हिच्या पोटापासून शरीराच्या वरच्या भागावर अनेक ठिकाणी गंभीर जखमा होत्या. त्यांचं नाक दाबून तोंड उघडलं गेलं आणि त्यानंतर तिच्या तोंडात रशियन विष ओतलं गेलं` असं स्वामी यांनी ट्विट केलंय. त्यांनी याबद्दल आपल्याकडे पुरावे उपलब्ध असल्याचंही म्हटलंय. सुनंदा यांच्या हत्येनंतर मृतदेहाचे फोटोही नष्ट करण्यात आले, असाही आरोप स्वामी यांनी केलाय.
सुनंदा पुष्कर यांच्या रहस्यमय परिस्थितीत झालेल्या मृत्यूनंतर पाच आठवड्यांनी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांनी दिल्ली पोलिसांद्वारे होणाऱ्या या प्रकरणाच्या चौकशीवर आपण नाखूश असल्याचं म्हटलं होतं. सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू १६ जानेवारी रोजी दिल्लीच्या एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये झाला होता.
२१ जानेवारी रोजी पोस्टमार्टम अहवालात सुनंदा यांचा मृत्यू `अनैसर्गिक` असल्याचं म्हटलं होतं. धोकादायक विष शरीरात गेल्यानं त्यांचा मृत्यू झाला असं म्हटलं जातंय. यानंतर मॅजिस्ट्रेटनं दिल्ली पोलिसांना या प्रकरणाची चौकशी गंभीरतेनं करण्याचे आदेश दिले होते.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.