VIDEO: सुकमा नक्षली हल्ला ग्राऊंड रिपोर्ट, गावकऱ्यांच्या वेशात केला हल्ला

छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात 25 जवान शहीद झाले. गेल्या काही वर्षांत नक्षलींनी घडवलेल्या क्रूर हत्याकांडापैकी हे एक हत्याकांड होतं. सुकमाच्या जंगलात नेमकं काय घडलं?

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 25, 2017, 06:23 PM IST
VIDEO: सुकमा नक्षली हल्ला ग्राऊंड रिपोर्ट, गावकऱ्यांच्या वेशात केला हल्ला title=

रांची : छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात 25 जवान शहीद झाले. गेल्या काही वर्षांत नक्षलींनी घडवलेल्या क्रूर हत्याकांडापैकी हे एक हत्याकांड होतं. सुकमाच्या जंगलात नेमकं काय घडलं?

रायपूरच्या सीएएफ कॅम्पमध्ये मंगळवारी शोकाकूल वातावरण होतं. छत्तीसगडच्या बस्तर भागात सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी सोमवारी सीआरपीएफच्या तुकडीवर भ्याड हल्ला केला. नक्षलींचा प्रभाव असलेल्या बुरकापाल-चिंतागुफा-भेजी भागाजवळ हा हल्ला झाला. त्यात शहीद झालेल्या 25 जवानांना सीएएफ कॅम्पमध्ये भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. या जवानांचं बलिदान वाया जाणार नाही, असं सांगतानाच नक्षलींना जशास तसं उत्तर देऊ, असा इशारा राजनाथ सिंह यांनी दिलाय.

सुकमा म्हणजे नक्षलवाद्यांचा बालेकिल्लाच. इथल्या घनदाट जंगलात सुमारे 300 नक्षलींनी सापळा रचून जवानांना टार्गेट केलं. गावक-यांच्या वेशात आलेल्या नक्षलींनी हा भीषण रक्तपात घडवून आणला. ज्याठिकाणी हा हल्ला झाला, तिथं जाऊन झी मीडियानं आढावा घेतला. 

सुकमा हल्ल्यानंतर सीआरपीएफची यंत्रणा सतर्क झालीय. नक्षलींना धडा शिकवण्यासाठी प्लानिंग सुरू झालंय. दरम्यान, गुप्तचरांच्या अपयशामुळं हा हल्ला झाल्याचा आरोप सीआरपीएफनं फेटाळून लावला आहे.

एकीकडे आदिवासी गावांपर्यंत रस्त्यांच्या माध्यमातून विकासाची गंगा पोहोचवण्याचा प्रयत्न सरकार करतंय. तर दुसरीकडे या विकासाच्या कामाला खीळ घालण्याचं काम नक्षली करतायत. विकासाच्या विरोधातली ही नक्षली कीड आता ठेचून काढण्याची गरज आहे.