मुंबई-दिल्ली प्रवास 12 तासांमध्ये ?

टॅल्गो ही स्पेनची ट्रेन बनवणारी कंपनी मुंबई आणि दिल्लीमध्ये त्यांच्या ट्रेनची चाचणी घेणार आहे.

Updated: Feb 7, 2016, 05:59 PM IST
मुंबई-दिल्ली प्रवास 12 तासांमध्ये ? title=

मुंबई: टॅल्गो ही स्पेनची ट्रेन बनवणारी कंपनी मुंबई आणि दिल्लीमध्ये त्यांच्या ट्रेनची चाचणी घेणार आहे. आता असलेल्या रेल्वे रुळांवर ताशी 160 ते 200 किमी वेगानं या ट्रेनची चाचणी होणार आहे. ही चाचणी यशस्वी झाली तर लवकरच ही ट्रेन प्रवाशांच्या सेवेमध्ये दाखल होईल.

रेल्वे बोर्डानं याची परवानगी दिल्यानंतर या ट्रेनची चाचणी घेण्यात येईल, अशी प्रतिक्रिया रेल्वे प्रशासनानं दिली आहे. या ट्रेनचे डबे इम्पोर्ट करण्यात येणार आहेत, तर त्याचं असेंम्ब्लिंग भारतात होणार आहे. 

या ट्रेनची चाचणी यशस्वी झाली, आणि 160 ते 200 किमी प्रतीतास या वेगानं ही ट्रेन धावली तर मुंबई ते दिल्लीचा प्रवास 12 तासांमध्ये शक्य होणार आहे. आता या प्रवासाला 17 तास लागतात. 
मुंबई-दिल्लीदरम्यान टॅल्गोची ही ट्रेन धावली तर फक्त वेळच नाही तर रेल्वेची वीजही वाचणार आहे. ही ट्रेन सामान्य ट्रेनपेक्षा 30 टक्के कमी वीज वापरते. तसंच ही ट्रेन सुरु करण्यासाठी फारसे तांत्रिक बदल करावे लागणार नसल्याचंही रेल्वे प्रशासनानं सांगितलं आहे.