तंदूर कांड : सुशील शर्माची फाशी रद्द; मरेपर्यंत तुरुंगात!

‘तंदूर कांडा’तील दोषी सुशील शर्मा याला दया दाखवत सर्वोच्च न्यायालयानं त्याची फाशीची शिक्षा रद्द केलीय. पत्नी नैना सहानीच्या क्रूर हत्येबद्दल सुशील शर्माला न्यायालयानं फाशीऐवजी जन्मठेपेची शिक्षा सुनावलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Oct 8, 2013, 11:21 AM IST

www.24taas.com, वृत्तसंस्था, नवी दिल्ली
‘तंदूर कांडा’तील दोषी सुशील शर्मा याला दया दाखवत सर्वोच्च न्यायालयानं त्याची फाशीची शिक्षा रद्द केलीय. पत्नी नैना सहानीच्या क्रूर हत्येबद्दल सुशील शर्माला न्यायालयानं फाशीऐवजी जन्मठेपेची शिक्षा सुनावलीय. त्यामुळे मरेपर्यंत सुशील शर्मा तुरुंगातच राहणार आहे.
दिल्लीतील तंदूर कांड नावाने बहूचर्चित असलेलं नैना सहानी हत्याकांडप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयानं निकाल जाहीर केला. दिल्ली युवक काँग्रेसचा माजी अध्यक्ष सुशील शर्मा या प्रकरणात दोषी ठरलाय.
परंतु, आपल्या कृत्याबद्दल सुशील शर्मानं न्यायालयात पस्तावा व्यक्त केला. तसंच त्याचा याअगोदरचा काही गुन्हेगारी रेकॉर्डही नसल्यामुळे न्यायालयानं त्याची फाशीची शिक्षा रद्द केलीय.
काय आहे तंदूर कांड
२ जुलै १९९५ साली सुशील शर्माने पत्नी नैना सहानीची दिल्लीतील गोल मार्केट येथील आपल्या राहत्या घरी गोळी मारुन हत्या केली होती. आणि पुरावे मिटविण्यासाठी सुशीलने आपला मित्र केशव कुमारच्या बगिया रेस्टॉरंटमध्ये नैनाचे छोटे छोटे तुकडे करुन तंदूरमध्ये जाळण्याचा प्रयत्न केला होता.
नोव्हेंबर २००३ साली सत्र न्यायालयाने याप्रकरणी सुशीलला फाशीची शिक्षा सुनावली होती. बगिया रेस्टॉरन्टचा मालक केशवकुमार यालाही पुरावे मिटवण्याच्या आरोपाखाली सात वर्षांची शिक्षा झाली. आरोपी सुशीलने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र तिथेही त्याची शिक्षा कायम ठेवण्यात आली होती. त्यानंतर १९ एप्रिल २००७ साली सुशिलने या शिक्षेविरोधात सुप्रिम कोर्टात धाव घेतली होती.

सुशील शर्मा यानं सुप्रीम कोर्टाचा हा निकाल स्वीकारलाय. या निकालाविरुद्ध सुशील कुमार याचिका दाखल करणार नाही, असंही त्याच्या वकिलांनी म्हटलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.