बांगलादेशने टीम इंडियाचा डाव २०० वर गुंडाळला

बांगलादेशचा गोलंदाज मुस्तफिजूर रहमानने सलग दुसऱ्या सामन्यात भारतीय फलंदाजांना यशस्वी होऊ दिलं नाही. मुस्तफिजूर रहमानच्या दणक्याने टीम इंडियाचा डाव अवघ्या २०० धावांवर गुंडाळला.  

Updated: Jun 21, 2015, 09:58 PM IST
बांगलादेशने टीम इंडियाचा डाव २०० वर गुंडाळला title=

मीरपूर : बांगलादेशचा गोलंदाज मुस्तफिजूर रहमानने सलग दुसऱ्या सामन्यात भारतीय फलंदाजांना यशस्वी होऊ दिलं नाही. मुस्तफिजूर रहमानच्या दणक्याने टीम इंडियाचा डाव अवघ्या २०० धावांवर गुंडाळला.  

मीरपूर येथे भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात दुसरा एकदिवसीय सामना सुरु आहे.  तीन सामन्यांच्या मालिकेत बांगलादेशने १-० अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे या सामन्यात विजय मिळवणे भारतासाठी महत्त्वाचे आहे. 

भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर रोहित शर्मा पहिल्याच षटकात शून्यावर बाद झाल्याने भारताची सुरुवात निराशाजनक झाली. यानंतर शिखर धवनने विराट कोहलीच्या साथीने डाव पुढे नेण्याचा प्रयत्न केला.

 विराट २३ धावांवर बाद झाला तर शिखर धवनने ५३ धावांची अर्धशतकी खेळी केली.  अंबाटी रायडूही शून्यावर बाद झाल्याने भारताची अवस्था ४ बाद ११० अशी झाली. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या धोनीने सुरेश रैनाच्या साथीने डाव पुढे नेण्याचा प्रयत्न केला. रैना ३४ तर धोनी ४७ धावांवर बाद झाला.  

अक्षर पटेल शून्यावर तर आर. अश्विन चार धावांवर बाद झाला. रविंद्र जडेजा १९  तर भुवनेश्वर कुमार दोन धावांवर बाद झाला. पावसामुळे सामना ४७ षटकांचा खेळवण्यात येणार आहे. बांगलादेशसमोर विजयासाठी २०० धावांचे लक्ष्य आहे. मुस्तफिजूर रहमानने १० षटकांत ४३ धावा देत सहा विकेट घेतल्या, तर रुबेल हुसेन आणि नासीर हुसेनने प्रत्येकी २ विकेट घेतल्या. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.