`टीम न मो` विरुद्ध `टीम नो मो`!

By Jaywant Patil | Last Updated: Thursday, September 12, 2013 - 18:33

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
पंतप्रधानपदाच्या उमेदवारावरून भाजपमध्ये महाभारत सुरू झालंय. या पदासाठी नरेंद्र मोदींच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झालंय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपले पूर्ण वजन मोदींच्या पारड्यात टाकलंय. पण भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी या मार्गात अडथळा म्हणून उभे आहेत.
पंतप्रधानपदाच्या उमेदवारीवरून भाजपमध्ये सुंदोपसुंदी सुरू आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आशीर्वादाने मोदी यांचा पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून राजतिलक जवळपास नक्की आहे. पण मोदींचा हा रथ सध्या अडवाणींनी अडवून धरलाय. अडवाणींचा पाठिंबा मिळावण्यासाठी रा. स्व. संघाचे प्रमुख नेते त्यांची मनधरणी करतायत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह हे स्वतः अडवाणींच्या नाकदु-या काढण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचले. मात्र अडवाणींनी आपल्या हट्टावर कायम आहेत.
मोदींना पाठिंबा देण्यास माझा आतला आवाज मला परवानगी देत नाही. त्यांच्याकडे नेतृत्वाची सूत्रे दिल्यास 2014 च्या निवडणुकीत भाजपचे पानिपत नक्की आहे, असे अडवाणींनी शिष्टाई करणा-यांना सांगितल्याचे समजते.
दरम्यान, मोदींच्या उमेदवारीला एकटे अडवाणीच नव्हे, तर अन्य महत्त्वाच्या नेत्यांचाही विरोध असल्याचे समजते. यावरून भाजपमध्ये सध्या सरळसरळ दोन गट पडले आहेत. राजनाथ सिंह, व्यंकय्या नायडू, नितीन गडकरी, अरूण जेटली, अनंत कुमार, थावरचंद गहलोत, रामलाल यांचा मोदींना पाठिंबा आहे. तर लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि सुषमा स्वराज यांचा मोदींना विरोध आहे. परंतु भाजपमध्ये असे कोणतेही मतभेद नाहीत, असं स्पष्टीकरण भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंग यांनी दिलंय...
तर दुसरीकडे नरेंद्र मोदींच्या बाजूने बिहारचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी हे उघडपणे मैदानात उतरलेत. नरेंद्र मोदींच्या बाजूने असलेले जनमत अडवाणींच्या लक्षात येत नाहीय, असा भडिमार सुशील मोदींनी केलाय. भाजपमध्ये सुरू असलेल्या या घडामोडी पाहता पक्षात एकवाक्यता नसल्याचं स्पष्ट होतंय अशी टीका सुधींद्र कुलकर्णी यांनी केलीय.
पुढच्या वर्षी दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून पंतप्रधान म्हणून देशाला संबोधित करण्याची स्वप्ने नरेंद्र मोदी पाहतायत. पण भाजपमधूनच त्यांच्या स्वप्नांना सुरूंग लावला जातोय.
एकीकडे विचारांची वचनबद्धता तर दुसरीकडे संघटनेतील नेतृत्वामध्ये समन्वयाचा अभाव यामुळे `पार्टी विथ डिफरन्स` आता `पार्टी विथ डिफरन्सेस` बनलीय... भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांमुळे जनता काँग्रेसला विटलीय, पण काँग्रेसला पराभूत करण्याची सुवर्ण संधी भाजप मतभेदांमुळे गमावणार अशी चिन्हे आहेत. भाजपमधील हे अंतर्गत महाभारत सत्ताधारी काँग्रेसच्या पथ्यावर पडले तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Thursday, September 12, 2013 - 18:33
comments powered by Disqus